भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

अमरावती: त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचं चित्र आहे.

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण घेत असल्याचं दिसत आहे. भाजपने बंदचं आवाहन केलं होतं. यामध्ये काही गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसत आहे. जे रस्त्यात दिसत आहे त्याला बंद करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून सुरु आहेत. आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु असून त्यांच्या हातात काठ्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा: मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन

काल काय घडलं?

काल दुपारी अडीचच्या सुमारास घोषणा देत नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचत होते. त्यापैकी काहींना चित्रा चौकात मुरमुरे, फुटाणे विक्रेत्यांची काही दुकाने उघडी दिसली. काही संतप्त नागरिकांनी बंदची मागणी करून दुकानाच्या दिशेने दगडफेक केल्याचे सांगण्यात येते. त्यात फुटाने विक्रेता श्रीराम गुप्ता हे जखमी झाले. वसंत चौक बालाजी मंदिराजवळ मेडिकल पॉइंटवर सुद्धा काहींनी दगड भिरकावले. चित्राचौक ते जुन्या कॉटन मार्केट मार्गावरील गोपाल किराणा या प्रतिष्ठानलाही बंद करण्यासाठी दगडफेक झाली होती. आंदोलनकर्त्यांनी अमरावतीतील जयस्तंभ चौक आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची तोडफोड केली. तसेच मालेगावमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. भिवंडी, नांदेडमध्ये देखील अशा घटना घडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावती, मालेगावमध्ये हिंसक वळण

घटनाक्रम कुठून सुरु झाला?

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यासाठी त्रिपुरामध्ये पोलीस परवानगी देत नव्हते, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. यावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं होतं. त्याचा निषेध त्रिपुरामध्ये नोंदवण्यासाठी तिथले हिंदुत्ववादी प्रयत्न करत होते. त्याठिकाणी हिंसा घडल्याचं दिसून आलं. अनेक मुस्लिमांची दुकाने फोडण्यात आली होती. त्रिपुरातील या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून काल महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुस्लिम समाज आणि संघटनांकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं. त्याचेच पडसाद आज दिसून येत आहेत.

loading image
go to top