Video : रस्ते चांगले करून दाखवा, तरुणाचे नितीन गडकरींना खुले आव्हान|Nitin Gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man Challenge Nitin Gadkari

रस्ते चांगले करून दाखवा, तरुणाचे नितीन गडकरींना खुले आव्हान

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा (Telhara Akola) तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे सर्वत्र या रस्त्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सर्वत्र हा मुद्दा पोहोचला आहे. रस्त्याला कंटाळून एका अनामिक व्यक्तीने नाव न जाहीर करता, मास्क परिधान करून रस्त्यांच्या समस्याबद्दल एक जनजागृतीपर व्हिडीओ बनविला आहे. यामाध्यमातून तरुणाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Union Minister Nitin Gadkari) रस्ते चांगले करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: चौपदरीकरण दीड वर्षात पूर्ण होणार; नितीन गडकरी

तालुक्यातील रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे हा एकमेव उद्देश या व्हिडिओ मागचा असल्याचे पाहवयास मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून, हा व्हिडिओ कोणी बनवला? याबाबत अनभिज्ञता असून, बनविणाऱ्याने आपला परिचय त्यामध्ये दिला नाही. मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या दमदार मंत्र्यांसाठी तेल्हारा तालुक्याचे रस्ते बनविणे कोणतीही मोठी गोष्ट नाही. परंतु, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे. गत सात वर्षांपासून जास्त काळापासून या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, चार वर्षांपासून सदर रस्ते खोदून ठेवले आहेत. या रस्त्यामुळे अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे तर, कित्येक जण जखमी झालेले आहेत. काही गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसुती झाल्याच्या धक्कादायक घटना सुद्धा घडल्या आहेत. रस्त्यांवर जीव गमावणाऱ्यांची कुटुंब निराधार प्रमाणे जीवन जगत असून, त्यांचा कोणीच वाली नाही. धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रस्त्यांवर हजारो नवीन वाहने सुद्धा खिळखिळी झाली आहेत आणि लक्षावधी रुपयांचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. स्थानिक आणि राज्य स्तरावरील सर्व लोकप्रतिनिधी निष्फळ ठरले म्हणून सदर तरुणाने थेट नितीन गडकरी यांना आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे.

व्हिडिओ मंत्र्यांपर्यंत पोहोचेल! -

निष्क्रिय लोकप्रतिनिधी, निगरगट्ट प्रशासन आणि सहनशीलतेची परिसीमा गाठलेली सुस्त जनता हे सर्व याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. या रस्त्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली, अनेकदा उपोषण झाले, अनेक अभिनव आंदोलन सुद्धा केले गेले. परंतु, उदासीनतेचा कळस गाठलेल्या लोकप्रतिनिधींना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. आता केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी याबाबत काय पावले उचलतात? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkari
loading image
go to top