Amravati 
Amravati Sakal

Amravati : विरूळ रोंघे गावात पुन्हा दोन मुली गंभीर

१४६ घरांतील पाण्याचे नमुने घेतले, जि. प.च्या सीईओंची भेट
Published on

धामणगावरेल्वे : दोन्ही सख्ख्या चुलत बहिणी एकाच वेळी दगावल्यानंतर जिल्हा आरोग्ययंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान हगवण व पोटदुखीच्या त्रासाने पुन्हा दोन मुलींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

१४६ घरांतील पाण्याचे नमुने घेण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी शनिवारला (ता. सहा) विरूळ रोंघे गावाला भेट देऊन आढावा घेतला.तन्वी दामोदर कांबे (वय १२) व जानवी दामोदर कांबे (वय १०) या दोन बहिणींना रात्री हगवण व पोटाचा त्रास झाल्याने त्यांना प्रथम गावातील आरोग्य पथकांद्वारे उपचार करण्यात आला.

मात्र, प्रकृती अधिक ढासळल्याने धामणगावरेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले.विरूळ रोंघे येथील नंदिनी प्रवीण साव (वय १०), चैताली राजेश साव (वय ११) अशा दोन सख्ख्या चुलत बहिणी शुक्रवारी सकाळी पोटदुखी व हगवणीच्या त्रासामुळे दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वरिष्ठांना दिला आहे.

तर मृतक नंदिनीची मोठी बहीण भक्ती (वय १३) व मृतक चैतालीचा लहान भाऊ देवांश (वय तीन) यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले होते. दोघांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे डॉ. मनीष अप्तूरकर यांनी सांगितले.

खासदार व माजी आमदार यांची भेट

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी येथे भेट दिली. दरम्यान, त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्ययंत्रणेला खासदार काळे यांनी दिले.

आरोग्ययंत्रणा सतर्क

येथील पाणीपुरवठ्याच्या लिकेज झालेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येत असून स्वच्छतेवर अधिक भर ग्रामपंचायतने दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, तहसीलदार गोविंद वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी भेट दिली. जिल्हा व तालुका आरोग्यपथक येथे कार्यान्वित असून बीडीओ माया वानखडे येथे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. घेतलेल्या पाणी नमुन्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.