सापळा लावला रानडुकरासाठी अकडले मात्र बिबट...अन्‌ वाघीणही आढळली...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

वाघीण, बिबट दिसले की भल्या भल्यांची भंबेरी उडून जाते. जंगलासह गावाखेड्यातही या वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होत असते. मात्र सावली वनपरिक्षेत्रातील शिर्शी बिटात जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत एका वाघिणीचा मृतदेह दिसून आल्याने नागरिकांनी शिकारीची शंका व्यक्त केली आहे.

चंद्रपूर/साखरी : सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या व्याहाड खुर्द उपक्षेत्रातील शिर्शी बिटात जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली; तर ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सीतारामपेठ येथे मृतावस्थेत वाघीण आढळून आली.

सध्या शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या परिसरात रानडुकरांनी हैदोस मांडला आहे. रानडुक्कर उभे पीक उद्‌ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानडुकरांची शिकार करणे सुरू केले आहे.

शिर्सी परिसरात सापळा लावला

या शिकारीसाठी जंगलाजवळील शेतात जाळे लावण्यात येत आहेत. शिर्शी परिसरात रानडुकराला पकडण्यासाठी काही जणांनी जाळे लावले होते. मात्र रानडुकरासाठी लावलेल्या जाळ्यात साडेतीन वर्षीय बिबट अडकला. त्याचा दुपारी अकरा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाली.

प्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन

सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी जी. व्ही. धाडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्रसहाय्यक डब्ल्यू. एन. बुराडे, वनसहाय्यक चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली. बिबट्याचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.

असं घडलंच कसं? : गडचिरोली : नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, वनविभागाचे कार्यालयही जाळले

वाघीण आढळली मृत्यावस्थेत

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली रेंजमध्ये येणाऱ्या सीताराम पेठ या बिटात पूर्णवाढ झालेली वाघीण बुधवारी (ता. 10) मृतावस्थेत दिसून आली. सीतारामपेठ आणि कोंडेगाव रस्त्यालगत वाघीण मृतावस्थेत पडून होती. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर वाघिणीच्या मृत्यूचे कारण कळू शकणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waghin death at tadoba and leopard at Sakharimal