
मागील अनेक दिवसांपासून वणी शहरातील तेली फैल येथील नगरसेवक प्रशांत निमकर यांच्या घरी जुगार खेळला जात होता. कोरोनानिमित्त लागू केलेल्या आपत्ती निवारण कायद्याला न जुमानता हा जुगार सुरू होता.
वणी (जि. यवतमाळ) : शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेवकाच्या घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शोध पथकाने रविवारी, 21 जून रोजी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून वणी शहरातील तेली फैल येथील नगरसेवक प्रशांत निमकर यांच्या घरी जुगार खेळला जात होता. कोरोनानिमित्त लागू केलेल्या आपत्ती निवारण कायद्याला न जुमानता हा जुगार सुरू होता. याची माहिती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, निखिल मडसे यांच्या पथकाने निमकर यांच्या घरी धाड टाकली.
त्यावेळी नगरसेवक प्रशांत उर्फ छोटू निमकर, माजी नगरसेवक विनोद निमकर, वसंत पाटील, नागेश रंगुरुवार, विलास निमकर, मनोज चांदेकर, विष्णू कदम, सचिन देशपांडे हे जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करण्यात करून त्यांच्या जवळून 44 हजार रुपये नगदी व एक लाख 61 हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद केला आहे.
प्रशांत उर्फ छोटू निमकर हा भाजपचा नगरसेवक होता. लॉकडाउनच्या काळात मारेगाव येथे अवैध दारू विक्री प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. परंतु त्याची अवैध धंद्यांसोबतची नाळ तुटली नाही. सोशल क्लबच्या नावावर तो जुगार अड्डा चालवत होता. मात्र, राजकीय पाठबळामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. मात्र, एलसीबीने केलेल्या कारवाईमुळे नगरसेवकांचे पितळ उघडे पडले आहे.