आठ हजार पोषण परसबाग निर्मितीसह वर्धा आला राज्यात अव्वल...वाचा 

वर्धा : ग्रामस्थांच्या सहकार्यातून निर्माण करण्यात आलेली परसबाग
वर्धा : ग्रामस्थांच्या सहकार्यातून निर्माण करण्यात आलेली परसबाग

वर्धा : ग्रामीण भागात गर्भवती, स्तनदा माता, बालक आणि किशोरवयीन मुले यांना आहारातून खनिज, लोह, मूलद्रव्ये, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण व्हावे म्हणून राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेदच्या माध्यमातून कृती संगम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात पोषण परसबाग निर्मिती करण्यात आली असून 8 हजार 288 परसबागांची निर्मिती करून वर्धा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. 

राज्य शासनाने या बाबीवर काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कृतीसंगम प्रकल्पातंर्गत 25 जून ते 15 जुलै 2020 दरम्यान माझी पोषण परसबाग विकसन मोहीम हा उपक्रम राज्यभर राबविला. यात जीवनचक्राच्या योग्य वेळी योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणावी म्हणून जनजागृती करण्यात आली. तसेच वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याच्या पद्धती व सवयी, शौचालयाचा वापर, स्वयंपाक घराशेजारी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता याबाबत जाणीवजागृती कारण्यासोबत उच्च दर्जाचे जैविक पद्धतीने पिकविलेल्या पोषणयुक्त भाज्या व फळे गरोदर महिला, स्तनदा माता, 6 ते 24 महिन्यातील बालकांच्या तसेच किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये आणण्यासाठी भर देण्यात येत आहे. 
वर्धा जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून आठ तालुक्‍यात कृतीसंगम विभागांतर्गत अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता या विषयावर कार्य केले जात आहे. गर्भधारणा ते बाळाच्या दोन वर्षादरम्यान एकूण एक हजार दिवसांच्या कालावधीमध्ये पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी कृतीसंगम प्रकल्पाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. 

उद्दिष्टापेक्षा पाचपट कार्य 
वर्धा जिल्ह्याला उमेद राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून 1 हजार 640 लक्षांक प्राप्त झालेले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्याने प्रत्येक तालुक्‍याला एक हजार परसबागांचा लक्षांक देण्यात आला होता. अभियानातील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध विषयाच्या समूह संसाधन व्यक्ती यांनी उल्लेखनीय कार्य करून वर्धा जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे राबवली. माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेमध्ये जिल्ह्याने लक्षांकापेक्षा पाचपट म्हणजे 8 हजार 288 परसबाग विकसित करून राज्यात परसबाग निर्मितीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 

गरोदर आणि स्तनदा काळातील स्त्रीचे पोषण, मुलभूत स्तनपान आणि पूरक पोषण आहाराच्या पद्धती, आजारी आणि कुपोषित बालकांच्या पोषणाची काळजी, नियंत्रण इत्यादी बाबींवर कृतिपूर्वक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
- स्वाती वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद, वर्धा 

-संपादन :  चंद्रशेखर महाजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com