वर्धा : शिवारात कापूस भिजला, घरात कुजू लागला!

विनोद पाटील
Sunday, 24 November 2019

अतिपावसामुळे कापूस शिवारातच ओलाचिंब झाला. मात्र, हा कापूस साठवलेल्या जागीच कुजू लागला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाची आशा निसर्गाने हिरावली.

वर्धा : जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाच्या थैमानाने शेतपिकांची प्रचंड नासाडी झाली. अतिपावसामुळे सोयाबीनचे उभे पिक काळवंडले आणि कापूस शिवारातच ओलाचिंब झाला. ढगाळ वातावरणामुळे लगबगीने कापूस वेचणी करीत घरी आणला.

हे नुकसान होऊ नये, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विक्रीचा सपाटा लावला आहे. या संधीचा फायदा घेत खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस कवडीमोल दराने खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

उत्पादनात कमालीची घट

जिल्ह्यात परतीच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे शेतपिकावर झालेल्या परिणामामुळे उत्पादनात कमालीची घट झाली. नगदीचे पीक म्हणून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. दिवाळीत उत्पादन होण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला.

कवडीमोल भावाने खरेदी

पावसाने काळवंडलेले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. हीच अवस्था कापूस पिकाची झाली. यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी कंबरडे मोडकळीस आले आहे.

कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट

सोयाबीन खरेदीदार या संधीचे सोने करीत खराब सोयाबीनमध्ये चांगले मिश्रित करून जादा दराने विक्री करीत आहेत. मात्र, यातून शेतकरी नागवला जात आहे, हे वास्तव आता पुढे येत आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात बोंडअळीने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली, तर उत्पादन खर्चात कमालीच्या वाढीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मात्र, काही प्रमाणात का होईना बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीतही तग धरला होता.

पावसाने पिकावर मोठा परिणाम

यावर्षी तर ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. अतिपावसामुळे सोयाबीन पिकाची भरणी झाली नाही. तणाच्या व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांचा कस लागला. पिकांची वाढ दीर्घकाळ रोखली गेली. सततच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पीक वाढीस लागले.

मात्र, परतीच्या ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाने पिकावर मोठा परिणाम झाला. यामुळे अपेक्षित उत्पादनाची आशा निसर्गाने हिरावली. दुसरीकडे, सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.

शेतकऱ्यांची धडपड

सोयाबीन काढल्यानंतर शिवारात ओला झालेला कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू केली होती. सीतादेवी करून मजुरांच्या साहाय्याने कापूस घरी आणला. कापसाची वेचणी केल्यावर थरावर थर रचण्यात आले. मात्र, या कापसाचा शेवटचा थर कुजू लागल्याने कापसाला वाळवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कुजलेल्या कापसाला व्यापाऱ्यांची पसंती

शेतकऱ्यांनी घरात साठवणूक ठेवलेला कापूस कुजू लागला. या कापसाला खासगी व्यापाऱ्यांची पसंती आहे. गावात जाऊन या कापसाची खरेदी गावठी खरेदीदारांकडून केली जात असल्याचे चित्र आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दर पाडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे. मात्र, या अवैध खरेदीदारांच्या मुसक्‍या कोण आवळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wardha : Cotton is soaked in Shivar, roten in the house