लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गुन्हा दाखल 

रूपेश खैरी
Wednesday, 15 July 2020

लग्नातून नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाली. तर या एका लग्नामुळे सहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात शासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणला आहे.

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यासाठी पिपरी येथील लग्न कारणीभूत ठरले. या लग्नापूर्वी विनापरवानगीने केलेल्या मटणाच्या (कंदुरी) कार्यक्रमाला गेलेल्यांवर दंडाची टांगती तलवार आहे. या कार्यक्रमाला 70 ते 80 लोकांना आमंत्रित केले. त्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी वर्धेच्या गटविकास अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा तातडीने शोध घ्यावा, असे पत्र पाठविले आहे. 

लग्नातून नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाली. तर या एका लग्नामुळे सहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात शासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणला आहे. या काळात कार्यक्रमांना बंदी आहे. असे असताना पिपरी (मेघे) येथील एका व्यक्तीने नियमांचे उल्लंघन करीत विवाहाचे आयोजन केले होते. त्याचा विवाह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारण ठरल्याचे म्हणत त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

ठळक बातमी - आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
 

सध्या वर्धा आणि आसपासच्या परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत त्या सर्वांचा संबंध पिपरी येथील लग्नाशी येत असल्याचे दिसून आले आहे. केवळ वर्धेतच नाही तर आर्वी आणि देवळी तालुक्‍यातील व्यक्तीही या विवाहात सहभागी असून, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यामुळे या भागातही कोरोनाचा उद्रेक झाला. यामुळे प्रशासनाने या नवरदेवावर गुन्हा दाखल करीत त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
 

परवानगीपेक्षा अधिक व्यक्ती 

या विवाहात परवानगीपेक्षा अधिक व्यक्ती आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याने कुठलीही परवानगी न घेता कंदुरीचा कार्यक्रम केला. यामुळे त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
 

कंदुरीत सहभागी असणाऱ्यांना बसणार दंड 

यातही सध्याची स्थिती लक्षात घेता आमंत्रित असलेल्या व्यक्‍तींकडून कोणतेही नियम पाळण्यात आले नाही. यामुळे त्यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. 
 

नवरदेवावर दंडात्मक कारवाई 
कोरोनापासून नागरिकांच्या बचावाकरिता सुरू असलेल्या शासनाच्या सर्वच प्रयत्नांवर पिपरी येथील एका लग्नाने पाणी फेरले. यामुळे या नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या कंदुरीच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा 
 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Wardha unlicensed mutton party, corona patients increased