esakal | सावधान! संकट अजून टळले नाही...!, वर्धा येथील कोरोना बाधित रुग्णाने पुन्हा वाढविली नागरिकांची चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

Corona affected patient in Wardha raises the concern of citizens again

कारंजा शहरातील नागरिकांना ’त्या’ नेर येथील कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह मंडळींचे ‘थ्रोटस्वेब’ नमूने निगेटिव्ह आल्याची बातमी कानावर पडताच तालुक्यासह जिल्ह्यावासीयांचा जीव भांड्यात पडल्याने चिंतेचे सावट दूर झाले होते. मात्र, या दिलासादायक बातमीत विरजण पडून पुन्हा एकदा कारंजा तालुक्यावर चिंतेचे सावट पुन्हा गडद झाल्याने संकट अद्यापही टळले नाही. परिणामी,  नागरिकांनी गांभीर्य ओळखून घरातच थांबणे गरजेचे झाले आहे.

सावधान! संकट अजून टळले नाही...!, वर्धा येथील कोरोना बाधित रुग्णाने पुन्हा वाढविली नागरिकांची चिंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारंजा (वाशीम)  : कारंजा शहरातील नागरिकांना ’त्या’ नेर येथील कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह मंडळींचे ‘थ्रोटस्वेब’ नमूने निगेटिव्ह आल्याची बातमी कानावर पडताच तालुक्यासह जिल्ह्यावासीयांचा जीव भांड्यात पडल्याने चिंतेचे सावट दूर झाले होते. मात्र, या दिलासादायक बातमीत विरजण पडून पुन्हा एकदा कारंजा तालुक्यावर चिंतेचे सावट पुन्हा गडद झाल्याने संकट अद्यापही टळले नाही. परिणामी,  नागरिकांनी गांभीर्य ओळखून घरातच थांबणे गरजेचे झाले आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह 13 जण निगेटिव्ह आल्याने कारंजा वासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील एक रुग्ण वर्धामधील सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कोरोनाबाधीत आढळून आल्याने तो कारंजा येथूनच एका खासगी हॉस्पिटल मधून प्राथमिक उपचार घेऊन गेल्याने शहरावर संकटाची टांगती तलवार कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण उपचारासाठी वाशीम जिल्ह्यातून शनिवारी सावंगी येथे दाखल झाला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर तो कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. कवठळ येथील एक 62 वर्षीय नागरिक कारंजा येथील एका खासगी रुग्णालयात ता.30 एप्रिल ते 4 मे दरम्यान अर्धांगवायू व निमोनियाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी भरती होता. तसेच त्याला बीपी, शुगरचेही आजार असल्याची माहीती आहे. कारंजा येथे त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला
अकोला येथे रेफर करण्यात आले होते.

अकोला येथील सिटी रुग्णालयातून उपचार घेऊन तो ता. 5 मे रोजी शेलुबाजार मार्गे आपल्या गावी आला होता. वर्धा येथील सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात जाण्याचे सांगण्यात आले होते. यामुळे तो दोन दिवस घरी थांबल्यानंतर 8 मे रोजी तो उपचारासाठी वर्धा येथे गेला होता. त्यानुसार तो दोन दिवसांपूर्वी सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला निमोनिया असल्याने त्याची कोराना चाचणी करण्यात आली होती. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी (ता.10) पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाला सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

कवठळ गावामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देवून तेथील नागरिकांची तपासणी केली असून त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास 50 लोकांना जिल्हा प्रशासनाने होमक्वारंटाईनच्या नोटीस दिल्या आहेत. तर, कारंजा शहरातील डॉक्टरसह एकूण 7 जण वाशीम पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. शिवाय, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा जिल्हास्तरावर सुद्धा शोध घेणे सुरू आहे. मात्र, हा संकटकाळ टाळण्यासाठी या सर्वांचे अहवाल येण्याची वाट कारंजा तालुकावासियांना घरात बसूनच पाहावी लागणार आहे.
 

loading image