वाशीम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे आढावा बैठकीत दिले आश्वासन
वाशीम जिल्ह्यातील सर्व विभागांचे रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात लवकरच निर्णय
 

वाशीम : राज्यातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक असलेल्या वाशीम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांखाली निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसले तरी लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या वाशीम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. अडाण नदीवर तीन बॅरेजस उभारण्याचा प्रस्ताव आहे. यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच जिल्ह्यातील लघु प्रकल्पांची कालवे दुरुस्ती झाल्यास पूर्ण क्षमतेने सिंचन होऊन सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल, ही बाब लोकप्रतिनिधींनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, तसेच जानोरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हा परिषदे अंतर्गत अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. आकांक्षीत जिल्ह्यातील पदे रिक्त राहू नयेत, याबाबत सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत प्रलंबित असलेल्या वीज जोडण्यांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २५०० कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यात आला आहे, उर्वरित सुमारे ४५०० कृषिपंपांना मार्च अखेरपर्यंत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. वीज पुरवठा करताना ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास या ठिकाणी जास्त खर्च येत असल्याने याठिकाणी सौरकृषी पंप देण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर कामे मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील दूध संघ कार्यान्वित होण्यासाठी पावले उचलण्यात येतील. जिल्हा महिला रुग्णालय व कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Washim district irrigation problem sloe shortly