धक्कादायक! बाबा आमटेंच्या प्रकल्पातील चौकीदाराची हत्या; बंधाऱ्यांत आढळला मृतदेह 

विनायक रेकलवार
Sunday, 24 January 2021

नारायण निकोडे हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. सोमनाथ प्रकल्प हा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी सावली तालुक्‍यातील गेवरा गावचे रहिवासी नारायण निकोडे हे राहत होते. 2008 मध्ये कुष्ठरोगी म्हणून ते येथे दाखल झाले होते.

मूल (जि. चंद्रपूर) ः सोमनाथ प्रकल्पात चौकीदार असलेल्या कुष्ठरुग्णाचा खून झाल्याची घटना समोर आली. धारदार हत्याराने भोकसून त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी मूल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. नारायण निकोडे (वय 75) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ प्रकल्पामध्ये ते चौकीदार म्हणून कार्यरत होते. दरम्यान, या खून प्रकरणातील एका आरोपीचा शोध लागला असल्याची माहिती समोर आली आहे. मूल पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.

नारायण निकोडे हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. सोमनाथ प्रकल्प हा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी सावली तालुक्‍यातील गेवरा गावचे रहिवासी नारायण निकोडे हे राहत होते. 2008 मध्ये कुष्ठरोगी म्हणून ते येथे दाखल झाले होते. याच ठिकाणी निकोडे चौकीदार म्हणून शेतावर देखरेख करण्याचे काम करत होते.

हेही वाचा - अखेर छडा लागला! पत्नीच्या प्रेमसंबंधास पतीचा होता विरोध; प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

 एका झोपडीवजा खोलीत ते एकटे राहत होते. 20 जानेवारीपासून ते बेपत्ता होते. याबाबत मूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. निकोडे बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला.

आजूबाजूला जंगलाचा परिसर असल्याने एखाद्या जंगली श्‍वापदाने हल्ला केला, असावा अशी शक्‍यता होती. मूल पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वन विभागातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या शोध मोहीम राबवत जंगलात शोध घेतला. दरम्यान, निकोडे यांच्या राहत्या घराचा मागील भागात असलेल्या बंधाऱ्यांत त्यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला. 

हेही वाचा - एक चूक आणि उडाला भडका; क्षणार्धात उध्वस्त झाला संसार  

त्यांच्या शरीरावर, पोटावर टोकदार व धारदार हत्याराने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या. यावरून त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे करत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watchman in Baba Amtes somnath project is no more in attack