पाणीपुरवठा 4 दिवसांवर ! टिंगल करता काय राव?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • कळमेश्वरात हिवाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई
  • नागरिक त्रस्त
  • नियोजनाचा अभाव
  • पाणी सोडण्याची "अ'वेळ

कळमेश्वर (जि.नागपूर) ः गेल्या अनेक वर्षांपासून "पाचवीला पुजल्याप्रमाणे' शहरवासींना पाण्याच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या कारणाने मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या 20 दिवसांपासून कळमेश्वर पालिकेकडून 1 दिवसाआड मिळणारे पाणी आता भर हिवाळ्यात 4 दिवसांवर गेल्याने पाण्याचा विविध कामांसाठी कसा वापर करावा, असा यक्ष प्रश्न शहरवासींसमोर उभा ठाकला आहे. कळमेश्वर पालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनाअभावी व दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार सुरू असून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

चार दिवसांवर केलेला पाणीपुरवठा तसेच पालिकेकडून पाणी सोडण्याच्या वेळा या थक्क करणाऱ्या असून 4 दिवशी कधी पहाटे 5 तर कधी रात्री 11.30 ते 12 अशा असून पालिका प्रशासन आम्हा नागरिकांची थट्टा तर करीत नाही ना, असा सवाल नागरिकांनी केला आहे. यामागे नेमके कारण असे असून कळमेश्वरपासून गोवरी परिसरातून शहराला पाणीपुरवठा होत असतो. गेल्या 20 दिवसांपासून या परिसरात 12 ते 14 तासांचे भारनियमन सुरू झाले. ही परिस्थिती गेल्या 20 वर्षांपासूनची आहे. त्याकरिता गोवरी ते कळमेश्वर वॉटर ट्रीटमेंट टॅंकपर्यंत फिडर एक्‍स्प्रेसची मागणी प्रस्तावित आहे. याकरिता सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अशा भारनियमनावर मात होऊ शकते. गत अनेक वर्षांपासून फिडर एक्‍स्प्रेसची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आहे. पालिकेच्या निवडणुका आल्या की ही बाब प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात असते. निवडणुका संपल्या की परत "ऑल इज वेल'; पण ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आजवर आलेल्या लोकप्रतिनिधींची त्याकडे पावलेच पडली नाही, ही खरी शोकांतिका आहे.

वेळापत्रक डोके सुन्न करणारे
निवळ भारनियमनाचे कारण देऊन आणखी किती काळ आम्हा शहरवासीयांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्न शहरवासींनी पालिका प्रशासनाला केला आहे. आधीच सन 1993 सालापासून सन 2000 पर्यंत येथील औद्योगिक परिसरातील एका इस्पात कारखान्याने कारखान्यातील प्रदूषणयुक्त पाणी सोडल्याने कळमेश्वरातील कूपनलिका, विहिरीचे पाणी खराब झाल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. त्यानंतर कळमेश्वर-ब्राह्मणी संयुक्त पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने व मध्यंतरी भारनियमन बंद असल्याने आजवर पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. परंतु परत पुन्हा "फिडर एक्‍स्प्रेस'अभावी भारनियमनाची झळ पाणीपुरवठा योजनेला बसलीच हे विशेष.

गेल्या 20 दिवसांपासून भारनियमन सुरू असल्या कारणाने पाणीपुरवठा योजनेत व्यत्यय येत असून भारनियमन बंद झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल.
स्मिता काळे
मुख्याधिकारी, नगरपालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply on 4 days