esakal | करावे तरी काय? पाणीपुरवठा विभागाकडे निधीच नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Water

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजनांना कात्री लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निधीअभावी आता कामांना 'ब्रेक' लागले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केवळ आरोग्याशी संबंधित कामे व बाबींना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवळ अत्यावश्‍यक कामे वगळता सर्व कामे थांबविण्यात आली आहेत.

करावे तरी काय? पाणीपुरवठा विभागाकडे निधीच नाही!

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : टंचाईच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी अद्याप मिळाला नसल्याने पाणीपुरवठा विभागावर आर्थिक टंचाई आली आहे. तर दुसरीकडे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील तब्बल तीन कोटी ८२ लाख रुपये अखर्चिक असल्याने हा निधी शासन जमा करण्यात आला आहे. निधीची ओरड करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाला यंदा दमडीही मिळाली नाही, आणि हातात असलेला निधी परत जाण्याची वेळ आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजनांना कात्री लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निधीअभावी आता कामांना 'ब्रेक' लागले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केवळ आरोग्याशी संबंधित कामे व बाबींना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवळ अत्यावश्‍यक कामे वगळता सर्व कामे थांबविण्यात आली आहेत.

निधीअभावी अनेक कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यात टंचाईच्या काळात टंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी मिळाला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. असे असले तरी पाणीपुरवठा विभागाकडे अखर्चिक असलेले तीन कोटी ८२ लाख रुपये विभागाच्या दिरंगाईमुळे परत गेले. परत गेलेल्या निधीतून जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठ्याची कामे झाली असती. मात्र, कामे न होताच निधी परत गेल्याने आता पाणीपुरवठा विभागावर नामुष्की ओढवली आहे. टंचाईच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या निधीतून कामे झाली असती. परंतु, काहीच्या दूर्लक्षामुळे मोठा निधी परत गेला आहे.

यंदा टंचाईच्या काळात केलेल्या उपाययोजनांची सात कोटी ८८ लाख रुपयांची मागणी पाणीपुरवठा विभागाने शासनाला केली आहे. हा निधी अद्याप आलेला नाही. दुसरीकडे हातात असलेला निधी परत गेल्याने आता पाणीपुरवठा विभागाला अखर्चिक निधीचे उत्तर देण्याची वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात उन्हाळ्यात सव्वातीनशे गावांमधील जवळपास चार लाख नागरिकांना टॅंकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजना स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यातच आता अनेक विभागांनी केलेल्या कामांचा निधीदेखील अडकण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. अशातच जवळ असलेला निधी परत गेल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सविस्तर वाचा -  ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर

नियोजनाचा अभाव
पाणीपुरवठा विभागाने शिल्लक असलेल्या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन करून खर्च केले असते तर जिल्ह्यात आणखी कामांची भर पडली असती. मात्र, आवश्‍यक त्या प्रमाणात संबंधित विभागाकडून नियोजन केले गेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता मोठी रक्कम पाणीपुरवठा विभागाच्या हातून गेल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top