
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जिल्ह्यात 34 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. यातून दोनशे ते तीनशे गावांची तहान भागविली जाते. सोबतच राष्ट्रीय पेयजल योजना, जलस्वराज्य प्रकल्प यातून अनेक योजना जिल्ह्यात मंजूर करण्यात आल्या होत्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खनिज विकास निधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेची पूर्तता वर्षे लोटूनही झाली नाही. जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना उन्हाळ्याच्या तोंडावर पूर्णत्वास आल्या नाही. त्यामुळे या उन्हाळ्यातही पाण्यासाठी नागरिकांवर भटकण्याची वेळ येणार आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जिल्ह्यात 34 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. यातून दोनशे ते तीनशे गावांची तहान भागविली जाते. सोबतच राष्ट्रीय पेयजल योजना, जलस्वराज्य प्रकल्प यातून अनेक योजना जिल्ह्यात मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील अनेक पाणीपुरवठा योजना निधीअभावी बंद पडल्या होत्या. त्यामुळे या गावांतील नागरिकांना दरवर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...
जिल्ह्यातील गावांतील हा प्रश्न जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडला होता. त्याची दखल घेत त्यांनी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी 1344. 84 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. ही सर्व कामे खनिज विकास निधीतून मंजूर करण्यात आली.
निविदा प्रक्रिया राबवून तब्बल 74 कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ही कामे कंत्राटदारांना देण्यात आली. मात्र, आज दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र, अजूनही अनेक योजना पूर्णत्वास आली नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विचारणा केली असता 45 पाणीपुरवठा योजना सध्या पूर्णत्वास आल्या आहेत.
31 पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी प्रगतिपथावर असलेल्या योजनांची कामे पूर्ण करण्यास कंत्राटदार चालढकल करीत असल्याचे चित्र आहे. रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी कंत्राटदारांना कामाचा पहिल्या हप्ता मिळाला. त्यातून त्यांनी कामे केली. दुसरा हप्ता लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तो अद्याप मिळाला नाही. त्यामुळेच अनेक योजनांची कामे सध्या बंद पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा निधी मिळाल्यास कामे सुरू करता येईल, असे एका ठेकेदाराने सांगितले.
सत्ताधारी, विरोधकही बसले गप्प
जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळाला आहे. या निधीवर डोळा ठेवून सध्या सत्ताधारी नियोजन करीत आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत जिल्ह्यातील अनेक प्रश्नांचा विसर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही पडला आहे. केवळ लाभाच्या योजना कशा पद्धतीने आपल्यास मिळतील यावर अनेक सदस्यांचे लक्ष आहे. या सगळ्यात रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा विषय मागे पडत चालला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! अमरावती जिल्हापरिषदेत कोरोना ब्लास्ट; एकाच दिवशी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह
44 योजना पूर्ण
जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रखडलेल्या 74 पाणीपुरवठा योजनांना खनिज विकास निधीतून मंजुरी दिली. यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. आत दोन वर्षांचा काळ लोटला. मात्र, या कालावधीत केवळ 45 पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
संपादन - अथर्व महांकाळ