धक्कादायक! अमरावती जिल्हापरिषदेत कोरोना ब्लास्ट; एकाच दिवशी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह

सुधीर भारती 
Tuesday, 2 March 2021

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज 700 ते 800 अशी रुग्णसंख्या येत आहे. त्यामुळे अमरावतीची चर्चा राज्य तसेच देशपातळीवरसुद्धा होत आहे.

अमरावती, : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या तीव्रगतीने वाढत चालली असतानाच आता सर्वसामांन्यांचा वावर असलेल्या जिल्हापरिषदेत देखील कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी एकाच दिवशी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तथापि, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज 700 ते 800 अशी रुग्णसंख्या येत आहे. त्यामुळे अमरावतीची चर्चा राज्य तसेच देशपातळीवरसुद्धा होत आहे. अशातच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नेता आणि सामाजिक कार्यकर्ता फरार; आरोपींचा शोध सुरु 

महापालिकेपाठोपाठ आता जिल्हापरिषदेत कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. यापूर्वी जिल्हापरिषदेत 8 ते 10 कर्मचारी, अधिकारी पॉझिटिव्ह आले होते. आता सोमवारी एकाच दिवशी 13 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. दरम्यान विविध विभागांमध्ये सॅनिटायजेशन करण्यात येत असून उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनीसुद्धा चाचणी केली असून त्यामध्ये काही जण पॉझिटिव्ह येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेतील बाधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले...

बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना शक्‍यतो जिल्हापरिषदेत प्रवेशच दिला जात नाही. काही तक्रारी असल्यास व्हॉट्‌सऍप क्रमांक देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाकडून शुक्रवारी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये 180 जणांची चाचणी करण्यात आली. सोमवारी त्यापैकी 13 कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्‍यक करण्यात आला असून दंडात्मक तरतूदसुद्धा करण्यात आली आहे.
-अमोल येडगे, 
मुख्य कार्यकारी अधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 employees tested corona positive in Amravati ZP