
अमरावती : प्रशासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने केलेल्या चुकीच्या कामाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतात पाणी शिरल्याने सध्या तलाव तयार झाला आहे. परिणामी तळेगाव येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवरच नाही तर त्यांच्या स्वप्नांवरसुद्धा पाणी फिरविले गेले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या निगरगट्टपणाचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.
२०१६-१७ मध्ये मोर्शी तालुक्यातील तळेगाव येथे तयार करण्यात आलेल्या निकृष्ट बंधाऱ्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसतो आहे. अतिवृष्टीमुळे ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाला वारंवार तक्रारी देण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तक्रारकर्ते ज्ञानेश्वर कापसे यांनी सांगितले, की २०१६-१७ मध्ये तळेगाव येथे सिमेंट नालाबांध व खोलीकरणाची ३० लाख रुपयांची कामे करण्यात आली. मात्र ही कामे तांत्रिकदृष्ट्या चुकीची असून नाल्याचे खोलीकरण पाहिजे त्या प्रमाणात करण्यात आले नाही. विशेष म्हणजे आवश्यक तेवढे खोलीकरण न करताच त्यावरच सीमेंट नाला बांधण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सदर बंधारा हा शेतकऱ्यांच्या जमिनीपेक्षा जवळपास ९० ते १०० सेमी उंचीवर बांधण्यात आल्याने नाल्याचे पाणी शेतात भरते आणि शेतातूनच तुडुंब वाहू लागते. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची पिके पाण्याखाली जात असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे.
शेतापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा गाडा चालत असतो. यंदा तर सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्ची घातले, मात्र आता त्यावर पाणी फेरले गेले आहे. विशेष म्हणजे नाल्याचे खोलीकरण होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास नव्हता, मात्र चुकीच्या खोलीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावरच नांगर फिरविला गेला आहे.
प्रशासकीय निगरगट्टपणा
यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सिंचन विभागाचे उंबरठे झिजविले, मात्र त्यांना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या निगरगट्टपणाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.