
महागाव (जि. यवतमाळ) : कोरोनाचे संकट अचानक जगावर कोसळले आणि जणू जगरहाटीच थांबली. हे संकट इतक्या लवकर असे काही रुप घेईल आणि सगळे व्यवहार थांबतील असे कोणालाच वाटले नव्हते. त्यामुळे अनेक लोक विविध कामानिमित्त आपल्या घरापासून दूर होते. अचानक आलेल्या या संकटाने रेल्वे सेवा, विमान सेवा बस सेवा तत्काळ थांबविण्यात आल्या. एवढेच नव्हे तर जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या. परिणामी कामानिमित्त बाहेर गावी, बाहेर राज्यात गेलेली एवढेच नव्हे तर बाहेर देशात गेलेली मंडळीही आपल्या घरापासून देर जिथे होती तिथेच अडकली. अशीच विपदा महागाव सारख्या छोट्या गावातील छोट्या मुलांवर आली आहे. केवळ नववीत शिकणारे हे 19 विद्यार्थी दूर हरियाणासारख्या परप्रांतात अडकले आहेत.
महागाव येथील फळविक्रेते राजेश पाटील यांचा मुलगा रोहन पाटील याचाही यात समावेश आहे. 'आई बाबा आम्हाला घराकडे यायचे आहे, काही तरी करा व आम्हाला लवकर घरी न्या', अशी भावनिक साद या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घातली आहे.
या विद्यार्थ्यांना घरी आणण्याबाबत राज्यसरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रोहनचे वडील राजेश पाटील यांनी केली आहे. बेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या 19 विद्यार्थ्यांना हरियाणातील घुसखाणी (ता. रोहतक) येथे मायग्रेशनसाठी जुलै 2019 मध्ये पाठविण्यात आले होते. यात महागाव, उमरखेड व यवतमाळ जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे शाळेने सुटी जाहीर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परत पाठविण्यासाठी रेल्वे प्रवासाचे आरक्षणसुद्धा करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे रेल्वे व अन्य सेवा बंद झाल्या. परिणामी, विद्यार्थी हरियाणामध्ये अडकून पडले आहेत.
अवश्य वाचा - चहा आणि कॉफी पिल्याने मिळतात हे फायदे...
नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाने दोन वेळा आरक्षित केलेले रेल्वेचे तिकीट शेवटी रद्द केले आहे. रोहन हा आपल्या पालकांच्या संपर्कात असून काहीतरी तजवीज करून मला परत घेऊन जा, अशी विनवणी तो करीत आहे. लॉकडाऊनमुळे हजारो किलोमीटर दूर असलेल्या पाल्यास परत आणणे अशक्य झाल्यामुळे पालक चिंतातूर झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आमच्या पाल्यास घरापर्यंत सुरक्षित पोहोचवावे, अशी आर्त साद राजेश पाटील यांनी घातली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.