बायको आणि मुलगी दिसेना म्हणून त्याने विहिरीत पहिले आणि ......

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आई व मुलीचे प्रेत आढळले विहिरीत, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोसंबे वाडी येथील घटना

जानेफळ (जि. बुलडाणा) : स्वतःच्या शेतातील हरबऱ्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेचे आपल्या तरुण मुलीसह विहिरीत प्रेत आढळून आल्याची घटना मेहकर तालुक्यातील मोसंबे वाडी येथे गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या दोघींची आत्महत्या की, घातपाताचा प्रकार याबद्दल सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

जानेफळ पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या मोसंबे वाडी (ता. मेहकर) येथील संतोष सखाराम मोसंबे हे भाऊबंदकीत पाहुणकी असल्याने भाऊबंदांसह गोरेगाव (तालुका सिंदखेड राजा) येथे गेले होते तर त्यांची पत्‍नी सौ. उषा संतोष मोसंबे (वय 40 वर्ष) आणि मुलगी कु. संजना संतोष मोसंबे (वय 19 वर्ष, दोन्ही रा. मोसंबेवाडी) या दोघी सकाळपासून आपल्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या होत्या. सायंकाळी 4.30 वाजे दरम्यान गोरेगाव येथून पाहुणकी वरून परत आल्यानंतर संतोष सखाराम मोसंबे हे शेतात पोहोचल्यानंतर त्यांना आपली पत्नी व मुलगी दोन्ही शेतात दिसून न आल्याने त्यांनी चोहीकडे फिरून बघितले. नंतर विहिरीत डोकावून पाहले असता त्यांना विहिरीत त्यांची पत्नी सौ. उषा व मुलगी कु. संजना या दोघींचे प्रेत पाण्यावर तरंगतांंना आढळून आले. सदर दृश्य पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडून आरडाओरड केली आणि भावांना मोबाईल वरून या घटनेची माहिती दिली. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली.

हे वाचा - परीक्षेच्या दिवसांमध्ये पालकांची जबाबदारी

आकस्मिक मृत्यूची नोंद

पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने प्रेत विहिरीतून बाहेर काढले व प्रेतांचा पंचनामा केला. या प्रकरणी फिर्यादी गणेश रामराव मोसंबे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील अधिक तपास जानेफळ पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: went to crop irritation and the bodies had to be removed from well