जेवणाकरिता बहिणीच्या घरी गेला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

चंद्रपूर तालुक्‍यातील धामणगाव येथील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या उज्ज्वल गेमाजी खेडेकर या मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण केले. यावेळी गावातील प्रवीण सुरेश सुरकर या युवकाच्या घराच्या दिशेने श्‍वान वारंवार जाताना दिसले. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तिसरीत शिक्षणाऱ्या नऊ वर्षीय बालकाची शाळेसमोरच गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपीला 24 तासांत गोंडपिपरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर शेतात लपून राहिल्यानंतर उपवास सहन न झाल्याने जेवणाकरिता बहिणीच्या घरी गेल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 

प्रवीण सुरेश सुरकर (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. तो धामणगावचाच रहिवासी आहे. बालकाच्या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याला राजुरा येथील न्यायालयात हजर केले. 

 

गळा आवळून हत्या 

तालुक्‍यातील धामणगाव येथील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या उज्ज्वल गेमाजी खेडेकर या मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली. या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण केले. यावेळी गावातील प्रवीण सुरेश सुरकर या युवकाच्या घराच्या दिशेने श्‍वान वारंवार जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. 

जाणून घ्या : भारतात दोन कोटी जोडपी संततीशिवाय

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली 

अधिक चौकशी केली असता प्रवीण घटनेनंतरच फरार आढळून आला. त्याच्या शोधासाठी चार पोलिस पथके रवाना करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रवीणला महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील नंदवर्धन गावातून अटक करण्यात आली. यानंतर अधिक चौकशी केली असता प्रवीणने गुन्ह्याची कबुली दिली. 

असे का घडले? : तुम्ही प्रेमीयुगुल आहात अन्‌ प्रायव्हसी हवी आहे?, मोबईल आहे ना...

न्यायालयात हजर केले 

शुक्रवारी (ता. 10) गोंडपिपरी पोलिसांनी 302 अंतर्गत गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर केले. आरोपीने खुनाची कबुली दिली असली; तरी बालकाची हत्या का केली, हे सांगितले नाही. त्यामुळे हत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत. आरोपीला चोवीस तासांच्या आत पकडण्यात यश आले आहे. हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी लवकरच त्याचा उलगडा होईल, असे ठाणेदार संदीप धोबे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Went to sister's house for dinner and got caught in a police trap at chandrapur...