काय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

सूर्याच्या संक्रमण काळात वर्षातील काही दिवस शून्य सावलीचे असतात. पश्चिम विदर्भातील काही निवड शहर व परिसरात मेच्या अखेरच्या आठवड्यात पश्चिम विदर्भातील निवडक शहरातील नागरिकांना हा अनुभव घेता येईल.

अकोला : वर्षभर सोबत चालणारी सावली अनाचक तुमची साथ सोडणार...हो हा अनुभव वर्षातून दोन दिवस काही ठरावीक काळासाठी घेता येणार आहे. यावर्षी वऱ्हाडातील अकोला, खामगाव परिसरातील नागरिकांना 23 मे रोजी सावली साथ सोडणार आहे. त्यापूर्वी वाशीममध्ये 20 मे तर बुलडाण्यात 22 मे रोजी हा अनुभव घेता येईल.

 

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो, म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. सूर्य दररोज 50 अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 2 दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.

भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे 6.78 अंश अक्षवृत्तावर 6 एप्रिल आणि 5 सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे 10 एप्रिल आणि 1 सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथपर्यंत २ मेपर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.

महाराष्ट्रात 3 ते 31 मेपर्यंत शून्य सावली
महाराष्ट्रात 3 मे ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून 23.50 अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. भारतात 23.50 अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.

काही सेकंदाचा फरक
महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात 15.6 अक्षांश ते धुळे जिल्ह्यात 21.98 अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. दुपारी 12 ते 12.35 या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण केल्यास शून्य सावली अनुभवता येईल.

वऱ्हाडात कोणत्या शहरात कोणत्या दिवशी शून्य सावली?
19 मे ः पुसद
20 मे ः मेहकर,वाशीम, वणी,
21 मे ः चिखली
22 मे ः मालेगाव, बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी
23 मे ः खामगाव, अकोला
24 मे ः शेगाव, दर्यापूर
25 मे ः अमरावती, तेल्हारा
26 मे ः परतवाडा
27 मे ः परतवाडा, चिखलदरा
28 मे ः वरूड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What do you say, the shadow will disappear!_ Akola news