आता काय होणार मेडिकलमधील त्या 24 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

दहा, बारा, पंधरा वर्षे मेडिकलमध्ये योग्य रितीने काम सांभाळणाऱ्या 24 कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना अचानक नोकरीवरून काढण्यात येणार असल्याची नोटीस ऐन कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात देण्यात आली.

नागपूर : मेडिकलमध्ये 2009 मध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत राज्यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय "ऑनलाइन' करण्याचा प्रकल्प सुरू झाला. पहिला प्रकल्प नागपूरच्या मेडिकलमध्ये सुरू झाला. या प्रकल्पाअंतर्गत मेडिकलमध्ये कंत्राटी पद्धतीवर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली.

मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह अनेक विभागांमध्ये रुग्णांची माहिती एका "क्‍लिक'वर उपलब्ध व्हावी या हेतूने ही "ऑनलाइन' पद्धत सुरू झाली. मेडिकलमध्ये कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी अतिशय योग्य रितीने हे काम हाताळले. दहा, बारा, पंधरा वर्षे मेडिकलमध्ये योग्य रितीने काम सांभाळणाऱ्या 24 कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना अचानक नोकरीवरून काढण्यात येणार असल्याची नोटीस ऐन कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात देण्यात आली.

आम्ही सारे कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्स. मेडिकलमध्ये मागील पंधरा वर्षांपासून इमानेइतबारे सेवा देत आहोत. आम्हाला कायम करा अशी मागणी आम्ही कधीच केली नाही. मिळते आहे, त्या वेतनावर नोकरी करीत असतानाही कोरोनाच्या लॉकडाउनचा फायदा घेत आम्हाला नोकरीवरून कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. नोकरीवरून काढले तर आम्ही आमच्या मुलांबाळानां जगवायचं कसं?
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे आम्ही व्यथा मांडणार आहोत. सध्या जे वेतन मिळत आहे, त्या वेतनावर आम्ही नोकरी करू. नोकरीतून कमी केल्यास आमच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास आमची मुलं रस्त्यावर येतील अशी व्यथा कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी व्यक्त केली.

मेडिकलमध्ये रुग्णहितासाठी मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. दहा वर्षे "ऑनलाइन' सेवा वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाह्यरुग्ण विभागात यशस्वी झाली. प्रारंभी पहिल्या टप्प्यात मेडिकल, मेयो आणि मुंबईचे जेजे तर दुसऱ्या टप्प्यात पुण्याचे बीजे मेडिकल कॉलेज, यानंतर मुंबई आणि राज्यातील सर्वच 14 वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइनद्वारे 2013 पर्यंत जोडण्याचे वचन देण्यात आले होते.

नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती असलेला रुग्ण मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर "एमआयडी' नंबरद्वारे रुग्णाच्या आजारासह उपचाराचा सर्व आराखडा मुंबईत बसून बघता येईल, अशी सोय हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत होती. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे दहा वर्षात ऑनलाइन जोडणी झालेली नाही. या योजनेअंतर्गत "मेडिकल'मध्ये मात्र बाह्यरुग्ण विभागापासून तर एक्‍स रे विभाग तसेच इतरही ठिकाणी ही ऑनलाईन पद्धत सोयीची झाली आहे.

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

तर आत्महत्या करणार....
कर्मचाऱ्यांनी दहा-पंधरा वर्षे सेवा देणाऱ्या कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी कायम करण्याची मागणी करू नये या भितीपोटी एचआयएमएसचा कंत्राट संपला असे खोटे कारण पुढे करीत नोकरीवरून काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. या 24 कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून काढल्यानंतर उपासमारीला कंटाळून जर आत्महत्या केली तर मात्र याची जबाबदारी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत प्रशासनावर असेल असा इशारा दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a future of contractual employees in Medicle?

टॉपिकस