हे कायं चाललं राज्यात, बॅंकेने लादले पीककर्ज, शासनाने केले माफ! 

file photo
file photo

गिरड (वर्धा) : पीककर्जाची उचल न करता येथील भूमिहीन शेतमजुराच्या नावाने बॅंकेने लाखावर कर्ज लादले. या कर्जाशी या शेतमजुराचा काहीही संबंध नसताना बॅंकेने कर्ज भरण्यासाठी तगादा लावला. एवढेच काय तर व्यक्तिगत बॅंक खात्याला होल्ड करून व्यवहारही ठप्प केले. मात्र शासनाने या मजुरावर कृपा केली आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्ती झाली. भारतीय स्टेट बॅंकेच्या येथील शाखेच्या या अफलातून प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतमजूर राजेंद्र तुळशीराम बावणे यांनी केली आहे. 

बॅंकेतून कुठलेही कर्ज न उचलता राजेंद्र बावणे यांच्यावर पीककर्ज लादल्या गेले. हे कर्ज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 18 मार्च 2020 रोजी आधार प्रमाणीकरण नोंद करून माफ करण्यात आले. कर्जमुक्ती योजनेतून आधार प्रमाणीकरण नोंद पावती 3255005108 क्रमांकानुसार कर्ज खाते क्रमांक 35898845390 आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी राजेंद्र बावणे यांच्याकडे एक लाख 42 हजार 263 रुपये एकूण कर्जाची थकबाकी असल्याचे दर्शविले होते. 
राजेंद्र बावणे हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित किंवा स्वखरेदीची जमीन नाही. त्यांच्या कुटुंबात कुणाकडेही शेतजमीन नाही. अद्याप कुठल्याही बॅंकेचे कर्ज त्यांच्यासह कुटुंबातील कोणत्याही सदस्याने घेतलेले नाही. राजेंद्र बावणे हे गृहरक्षक दलात कार्यरत आहेत. शिवाय मगन संग्रहालय समिती या संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 

बॅंकेचा प्रताप; कर्जमाफीचाही दिला लाभ 

मागील वर्षी त्यांनी गिरड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गृहरक्षक म्हणून सेवा दिली. या सेवेच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशाची रक्कम उचलण्याकरिता ते बॅंकेत गेले असता त्यांना पीककर्ज भरण्यास सांगण्यात आले. हे ऐकून राजेंद्र चांगलेच अचंबित झाले. पैशाची उचल करायची असल्याने त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांशी वाद घातला नाही. राजेंद्र बावणे यांचे या बॅंकेतील 11702277566 क्रमांकाचे खाते होल्ड करण्यात आले. त्यामुळे त्यांना पैशाची उचल करणे शक्‍य झाले नाही. यानंतर राजेंद्र बावणे यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली. बॅंक अधिकाऱ्यांना कर्ज उचलले नसल्याचे सांगितले. पैशाची अत्यंत गरज असल्याचे ओळखून बॅंक खात्यावरील होल्ड काढण्यात आले आणि राजेंद्र यांनी पैशाची उचल केली. याच कालावधीत शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती. राजेंद्र बावणे यांचे नाव कर्जमुक्ती योजनेत आले. यानंतर बॅंक अधिकाऱ्यांनी सुचविल्याप्रमाणे राजेंद्र यांनी कर्जाचे आपले सरकार केंद्रावरून आधार प्रमाणीकरण करून घेतले आणि पोच पावती बॅंकेत जमा केली. यानंतर या लादलेल्या पीककर्जातून राजेंद्र बावणे यांची सुटका झाली. मात्र बॅंकेने कर्ज न उचलता माझ्यावर कर्ज लादले. या अफलातून प्रकारामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र बावणे यांनी केली आहे. 


या प्रकारणाविषयी बॅंकेचे फील्ड ऑफिसर यांना विचारणा करावी लागेल. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे तेच सांगू शकतील. याबाबत मी आपणाला मंगळवारी सांगू शकेल. 
-मिलिंद नागदेवे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, गिरड 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com