का केली असेल सुशांत सिंगने आत्महत्या? काय म्हणतात मानसोपचारतज्ज्ञ?

mansopchar
mansopchar
Updated on

पुसद( जि. यवतमाळ) : मेंदूचे कार्य विचार निर्माण करण्याचे आहे. मनस्वास्थ्य बिघडले की प्रत्येकाच्या मनात एकदा तरी आत्मघाताचे विचार येतात. सर्वजण त्यावर कृती करीत नाही. इप्सित पूर्ण झाले नाही तर मार्ग दिसत नाही. अशावेळी काहींचे नकारात्मक विचार प्रबळ होतात. मेंदू हायजॅक होतो अन्‌ कृती यंत्रवत होते.

अविचारातून स्वतःला क्षणात संपवून टाकतात. आत्महत्येचा विचार हा मेंदूचा विकार आहे. त्यावर योग्य औषधोपचाराची व मानसिक आधाराची खरी आवश्‍यकता असते," असे मत पुसद येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अक्षय शिंदे यांनी व्यक्त केले.

सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्मघाताने सिनेसृष्टी, त्याचे चाहते आणि सामान्यही हादरले. ' छिछोरे ' या त्याच्या युवामनाला भावलेल्या चित्रपटातून तो आपल्या मुलाला धीर देतो. त्याला आत्महत्येसारख्या अविचारापासून परावृत्त करतो. या त्याच्या चित्रपटातील संदेशाचा युवामनांवर सकारात्मक परिणाम होतो. असे असताना प्रत्यक्ष जीवनात सुशांतने चुकीचे पाऊल उचलल्याने समाजाला धक्का बसला आहे. हरहुन्नरी सुशांतने असे का वागावे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अक्षय शिंदे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी मनोविकारांच्या संदर्भातील आपले मत विषद केले.

चित्रपटसृष्टीतील अनेक नट-नट्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यावर मनोवैज्ञानिक अभ्यास झाला असून मानसिक विमनस्कतेतून हे प्रकार घडल्याचे लक्षात येते. उदासीनता, नैराश्‍य, कधी एकदम उत्साह तर कधी उदासिनता, व्यक्तिमत्त्वातील अस्वस्थता, व्यसनाधीनता व सायकोसिस हे मनाच्या दोलायमान स्थितीचे प्रकार मेंदूच्या विकारातून पाहावयास मिळतात.
भावनिक आंदोलनातून मग मेंदूचा तोल जातो व अघटीत घटना घडतात. या मेंदूविकारातून बरे करण्यासाठी मनोवैज्ञानिकांची गरज भासते. हार्ट अटॅक ही जशी मेडिकल इमर्जन्सी समजण्यात येते तशाच प्रकारे आत्महत्येच्या विचारांमध्ये गुरफटलेल्या व्यक्तीवर 'सायकॅट्रिक इमर्जन्सी' मध्ये अतिशीघ्र उपचार करण्याची खरी गरज असते, असे डॉ. अक्षय शिंदे म्हणाले.

आत्महत्येचे विचार व्यक्तीच्या मनात घोळत असतील तर काही संकेत मिळतात का ? या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. शिंदे म्हणाले, निश्‍चितच काही संकेत अशा व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून मिळतात. हे संकेत ओळखणे खरे गरजेचे असते आणि मनोवैज्ञानिकांची तीच खरी किमया असते. आपल्याकडे मानसिक आरोग्याविषयी जागरुकता नाही. अन्य फॅकल्टीच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या लक्षात ही बाब येत नाही. त्यांना क्षुल्लक लक्षणे वाटतात व ते दुर्लक्षित करतात. त्यामुळे योग्य निदान व उपचारासाठी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे."

सकारात्मक विचार
ते पुढे म्हणाले की, मनात सकारात्मक विचार ठेवले तर मेंदू पोषक रसायन तयार करतो. त्यामुळे मनाला सकारात्मक कामात नेहमी गुंतवून ठेवले पाहिजे. चांगली पुस्तके वाचणे, मित्रांसोबत वेळ घालविणे, नात्यागोत्यात गुंतून राहणे, समाजात विधायक कार्य करणे, नवीन छंद जोपासणे, सकारात्मक चित्रफीत बघणे, शिवाय योगासन, व्यायाम या गोष्टींची मेंदूचे संतुलन राखण्यास मोलाची मदत होते. मन विचारात भरकटत नाही. चांगल्या मनस्वास्थ्यासाठी वाईट संगत, व्यसने, अनाठाई खर्च करणे टाळले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

संधी मिळताच आत्मघात
मनोरुग्णाला आत्मभान (इन्साइट अवेअरनेस) नसते. औषधांबद्दल त्याला संशय वाटतो. बरेचदा असे रुग्ण औषधे घेण्याचे टाळतात. स्वाभाविकच त्यांची मानसिक अवस्था खालावते. असे रुग्ण संधी मिळताच आत्मघाताचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेळेची निवड ते करतात. घरातील लोक झोपलेले असताना एकटेपणाची भावना तीव्र नैराश्‍य निर्माण करते व त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो. पुरुषांच्या तुलनेत युवती-महिलांमध्ये आत्मघाताचे प्रमाण अधिक आहे, याकडे डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले. आज सोशल मीडियावरून जो तो सल्ल्यांचा पाऊस पाडतो. परंतु, मनोविकार दूर करण्यासाठी योग्य औषधोपचार व मानसिक आधार देण्याची खरी गरज आहे, असा मुद्दा त्यांनी शेवटी मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com