काय आश्‍चर्य? आता ऑनलाइन जुळणार लग्नगाठी 

दिनकर गुल्हाने 
शनिवार, 30 मे 2020

येथील निवृत्त कलाशिक्षक षडानन वेरुळकर यांच्या पुढाकारातून रविवारी, (ता.31) हा ऑनलाईन उपवर-वधू परिचय मेळावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहे. यासाठी झूम ऍप्सचा उपयोग करण्यात येत आहे. अशाप्रकारचा हा भावी जीवनाचा पार्टनर सर्च करणारा राज्यातील पहिलाच मेळावा असल्याने उपवर-वधू व त्यांच्या पालकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.

पुसद (यवतमाळ ) : लग्नगाठ ही स्वर्गात पडल्या जाते, असे म्हटले जाते. परंतु लग्नगाठ जुळून आणणे आजच्या धावपळीच्या काळात सोपे काम नव्हे. अलीकडे वेळ, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी उपवर-वधू परिचय मेळावे भरविण्यात येतात. मात्र, 'लॉकडाउन'च्या काळात मेळाव्यांना बंदी आहे. त्यावर पर्याय म्हणून 'ऑनलाइन उपवर-वधू परिचय' मेळाव्याचे आयोजन पुसद येथे करण्यात आले आहे. 

हे वाचा— तुकाराम मुंढेंची एकच फाईट, विरोध करणाऱ्यांचे वातावरण टाईट...

निवृत्त कलाशिक्षकाचा पुढाकार 

येथील निवृत्त कलाशिक्षक षडानन वेरुळकर यांच्या पुढाकारातून रविवारी, (ता.31) हा ऑनलाईन उपवर-वधू परिचय मेळावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहे. यासाठी झूम ऍप्सचा उपयोग करण्यात येत आहे. अशाप्रकारचा हा भावी जीवनाचा पार्टनर सर्च करणारा राज्यातील पहिलाच मेळावा असल्याने उपवर-वधू व त्यांच्या पालकांची उत्सुकता वाढीस लागली आहे. षडानन वेरुळकर यांना सामाजिक समता जोपासत काही वर्षांपूर्वी "राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक महाराष्ट्र" या व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला. यामार्फत त्यांनी मराठा समाजातील उपवर-वधू परिचय पत्र संकलित केले. हे नेटवर्क बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. याच सोशल मीडियाचा वापर करत त्यांनी अनुरुप विवाह जुळवून आणले. मागील वर्षी लग्नगाठींची शंभरी त्यांनी पार केली. याबद्दल त्यांचा मराठा समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदा "लॉकडाउन'मुळे उपवर-वधू परिचय मेळावे होऊ शकले नाही. 

हे वाचा—  दुष्काळात तेरावा महिना : पेट्रोल, डिझेलचा उडणार भडका 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार 

गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उपवरांना वधूंचा शोध घेता आला नाही. तर मुलीसाठी वर शोधण्याचे पालकांचे कामही थांबले. मात्र, षडानन वेरुळकर यांनी विनामूल्य ऑनलाइन उपवर-वधू परिचय मेळाव्याची संकल्पना मांडली. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेण्यात येत आहे. कॉन्फरन्सिंग दोन सत्रात होत आहे. सकाळी दहा ते साडे बारा व दुपारी अडीच ते साडेचार या वेळात परिचय देण्यात येईल. यावेळी उपवर-वधू यांच्याकडील कुटुंबातील सर्व सदस्यांना उपस्थित राहता येईल. विशेष म्हणजे साडेबारा ते दोनपर्यंत सहभागी व्यक्तींनी आपल्या घरीच भोजन करावे व सुरक्षित राहावे, असा संदेशही देण्यात आला आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकरिता उपवर-वधु मुला-मुलींना हजर राहण्यासाठी स्वत: उपवर-वधु मुला-मुलींनी ऑनलाइन विनामूल्य नोंदणी अर्ज पाठविणे आवश्‍यक आहे. सर्व ग्रुप सभासदांनी नोंदणी अर्जाची लिंक आपल्या उपवर-वधू मुला-मुलींना त्वरीत पाठवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

राज्यात ऑनलाइन उपवर-वधू परिचय मेळावा प्रथमच भरत आहे. यासाठी व्हॉट्‌सअप सोशल मीडिया व झूम ऍप्स वापर होत आहे. विवाहोत्सुक मुला-मुलींना ही एक चांगली संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा या मेळाव्यासाठी उपयोग करण्यात येत आहे. अशा ऑनलाइन मेळाव्यांना समाजात चालना मिळण्याची गरज आहे. 
-षडानन वेरुळकर,राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक, महाराष्ट्र 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What a surprise? Weddings to match online now