...अन् व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप झाले लॉकडाउन; कारवाईच्या भीतीने सावध भूमिका

whatsapp.png
whatsapp.png

मोताळा (जि.बुलडाणा) : आजच्या संगणकीय युगात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हे माहिती आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. परंतु कोरोनाच्या संकटादरम्यान आक्षेपार्ह मजकूर, चुकीची माहिती किंवा द्वेषयुक्त संदेश पाठवणार्‍या विरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बहुतांश ग्रुप अ‍ॅडमीन यांनी केवळ आपली पोस्ट शेअर करता येईल, अशी सेटिंग केली आहे. त्यामुळे ग्रुपवर येणार्‍या संदेशाचे प्रमाण घटले असून, ग्रुप सुद्धा लॉकडाउन झाल्याचे भासत आहे.

देशभरात कोरोना विषाणूंचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधक व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अलीकडे प्रत्येक घरात अँड्रॉईड मोबाईल पोहोचला असून, अनेक मोबाईल धारक विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य आहेत. काही जण आपल्याकडे येणार्‍या पोस्टची कोणतीही शहानिशा न करता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करताना दिसतात. कोरोनाच्या संकट काळात अफवा, आक्षेपार्ह व द्वेष परवणार्‍या संदेशामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. 

अशा संकटकाळात अफवा पसरवून सामाजिक तेढ निर्माण करणार्‍यांची हयगय केल्या जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. असे कृत्य करणार्‍या ग्रुप सदस्यासह ग्रुप अ‍ॅडमीनला सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे. पोलिसांची सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. दरम्यान, बहुतांश व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन यांनी फक्त अ‍ॅडमीनला ग्रुपमध्ये पोस्ट करता येईल, अशी सेटिंग चेंज केली आहे. त्यामुळे येणार्‍या संदेशाचा भडीमार थांबला असून, ग्रुप शांत झाल्याचे दिसत आहेत.

डीआयजींचा व्हिडिओ व्हायरल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह, चुकीचा व दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट करणार्‍या सदस्यांसह ग्रुप अ‍ॅडमीनवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे केवळ अ‍ॅडमीनला पोस्ट करता येईल, अशी ग्रुप सेटिंग करण्याचे आवाहन करताना महाराष्ट्र सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे बहुतांश व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीननी तातडीने ग्रुप सेटिंग बदलल्याचे दिसत आहे.

...तर अ‍ॅडमीनवरही कारवाई होणार
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केवळ अ‍ॅडमीनला पोस्ट करता येईल, अशी सेटिंग करूनही जर ग्रुपवर अफवा, आक्षेपार्ह पोस्ट, द्वेष पसरविणारे संदेश प्रसारित होत असतील, तर ग्रुपवर अ‍ॅडमीनला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. सोबतच अ‍ॅडमीनवर कायदेशीर कारवाई केल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमीन यांनीसुद्धा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणताही मजकूर पोस्ट करताना खबरदारी घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com