esakal | पाच वर्षांपर्यंत ठेवले युवतीशी प्रेम अन्‌ लग्नाची वेळ आली तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रेमात माणूस केव्हा काय करेल, याचा काही नेम नसतो. प्रेम असतेच असे की, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करायलाही कुणी मागेपुढे पाहत नाही. आता अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्‍यातील चिचखेडचीच गोष्ट घ्या ना, एका युवकाने युवतीसोबत पाच वर्षांपर्यंत प्रेमप्रकरण सुरू ठेवले अन्‌ लग्नाची वेळ आली तेव्हा तिला बाजूला सारले; पण युवतीने वेळीच दखल घेतल्याने त्या नवरोबाचा भंडाफोड झाला. अखेर "त्या' नवरोबाला गजाआड व्हावे लागले.

पाच वर्षांपर्यंत ठेवले युवतीशी प्रेम अन्‌ लग्नाची वेळ आली तेव्हा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पाच वर्षांपर्यंत प्रेमप्रकरण सुरू ठेवत त्याने प्रेयसीचा लैंगिक छळ केला. परंतु बोहल्यावर चढण्याची वेळ आली तेव्हा त्याने दुसऱ्याच युवतीशी लग्न करण्याचे ठरविले. प्रियकराच्या अशा बेताल वर्तनामुळे वैतागलेली प्रेयसी अखेर लग्नसमारंभ आटोपताच तेथे पोहोचली अन्‌ त्या नवरोजीवर अक्षता पडल्यानंतर पंधरा मिनिटात गजाआड होण्याची वेळ आली.

भातकुली तालुक्‍याच्या चिचखेड अमरापूर येथील अखिलेश तेलखडे याचे मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील एका 24 वर्षीय युवतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. लग्नाचे आमिष दाखवून अखिलेशने तिचे शारीरिक व लैंगिक शोषण केले, असा युवतीचा आरोप आहे. आज, ना उद्या प्रियकरासोबत आपल्या आयुष्याची खूणगाठ बांधली जाईल, या अपेक्षेत तिनेसुद्धा त्याच्यावर प्रेम केले. मात्र, त्याच्या मनात काही वेगळाच विचार सुरू होता.

विष देऊन केला होता खुनाचा प्रयत्न

ज्यावेळी तिने लग्नाबाबत अखिलेशकडे विचारणा केली तेव्हा नोव्हेंबर 2019 मध्ये तिला रहाटगाव परिसरात नेऊन काही लोकांच्या मदतीने बळजबरीने त्याने विषारी औषध पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्नसुद्धा केला, असा आरोप पीडितेने पोलिसात दाखल तक्रारीत केला आहे. मात्र त्यातून ती बचावली.

पोलिस घेऊन पोहोचली लग्नसमारंभात

आता आपली पूर्व प्रेयसी काहीच करणार नाही, या विचारात हा युवक होता. त्यानंतर लग्नापूर्वी आपले प्रेमप्रकरण सुरू होते ही बाब लपवून तो दुसऱ्या युवतीसोबत बोहल्यावर चढला. मात्र त्याचा शोध घेत त्याची पूर्वप्रेयसी आधी खल्लार ठाण्यात पोहोचली. त्यानंतर लग्नसमारंभ सुरू होता तेथे पोलिसांना घेऊन पोहोचली. खल्लार पोलिसांनी अखिलेश याला ताब्यात घेतले. परंतु गुन्हा दाखल न करता, ते नवरोजीला घेऊन वलगाव ठाण्यात पोहोचले, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू

नवरोबाला सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी

वलगाव पोलिसांनी अखिलेशविरुद्ध अत्याचार, प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्नासह ऍट्रॉसिटी ऍक्‍टअन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वलगाव पोलिसांनी अखिलेशला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कायदेशीर कारवाई
पीडितेची तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने वलगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई केली.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, वलगाव ठाणे.