esakal | सरपंचाचं पोर राज्याचा मंत्री होतो तेव्हा! 
sakal

बोलून बातमी शोधा

vjay wadetiwar

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात एक युवा अतिशय जोमाने पक्षाचे काम करीत आहे, ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेली. पक्षनेते गजानन किर्तीकर यांनी ही बाब हेरून विजय वडेट्टीवारांना संधी दिली.

सरपंचाचं पोर राज्याचा मंत्री होतो तेव्हा! 

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सामान्यांसाठी काम करणारा एक साधा शिवसैनिक. त्यानंतर कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक, अन्‌ आता राज्याचे कॅबीनेट मंत्री. विजय वडेट्टीवार यांचा हा हा राजकीय प्रवास अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. पण त्यामागे अतिशय संघर्षाची गाथाही आहे. 

वडील होते करंजीचे सरपंच

विजय वडेट्टीवार यांचा जन्म गोंडपिपरीजवळील करंजी या खेडेगावात झाला. वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजी गावचे सरपंच होते. अनेक कडक निर्णय घेत त्यांनी गावात आपला वेगळा ठसा निर्माण केला. पण अचानक त्यांचे निधन झाले. अन्‌ येथूनच विजय वडेट्टीवार यांचा संघर्ष सुरू झाला. आई कमलाबाई अन्‌ दोन लहान भाऊ यांचाही भार त्यांच्याच खांद्यावर आला. करंजी गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. मग गोंडपिपरीच्या जनता विद्यालयातून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्यांच्या कुटुंबियांच्या वाट्याला आलेल्या संघर्षमय स्थितीनंतर त्यांनी गाव सोडले. ते गडचिरोलीत गेले. 

शिवसेनेत प्रवेश 

एकीकडे कुटुंबियांची जबाबदारी तर दुसरीकडे शिक्षण अशा दोन्ही भूमिका त्यांनी पार पाडल्या. अशातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सामान्यांचा आवाज आपल्या नेतृत्वात त्यांनी बुलंद केला. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात एक युवा अतिशय जोमाने पक्षाचे काम करीत आहे, ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेली. पक्षनेते गजानन किर्तीकर यांनी ही बाब हेरून विजय वडेट्टीवारांना संधी दिली. अन्‌ येथूनच त्यांचं नेतृत्व फुललं. 

वनविकास महामंडळाचे अध्यक्ष 

यानंतर ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. नंतर नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राणे यांनी कॉंग्रेस सोडली. पण विजय वडेट्टीवार यांनी एकनिष्ठतेचा परिचय दिला. यानंतर कॉंग्रेसमध्ये त्यांनी आपल्या प्रतिभेने पदाचे शिखर गाठले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विशाल सभा घेतली होती. पण या मोठ्या आव्हानाला तोंड देत वडेट्टीवार यांनी विजयश्री खेचून आणली. आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील कॉंग्रेसचं एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. 

कॉंग्रेसने दिलं विरोधी गटनेतेपद 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचं पाणीपत झालं. पण त्यांच्याच नेतृत्वात सुरेश धानोरकर यांच्या रुपाने एकमेव खासदार निवडून आला. यानंतर कॉंग्रेसने त्यांना विरोधी गटनेतेपद दिलं. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृवाची चुणूक दाखवीत अनेक आमदारांना निवडून आणलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. अन्‌ मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. 

अवश्‍य वाचा- कडाक्‍याच्या थंडीने पिकांचे नुकसान; शेतकरी संकटात 

कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ 

सोमवारी (ता. 30) त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे वडेट्टीवार यांचे जन्मगाव असलेल्या करंजीसह गोंडपिपरी तालुक्‍यात अतिशय उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. करंजीसारख्या लहानशा गावात जन्मलेला, शाळा शिकलेला एका सरपंचाचं पोरआज राज्याचा कॅबीनेट मंत्री झाला, याबाबत अनेक तरुणांना आजही कुतूहल आहे. 

कुटुंबियांनी घेतले कोंडया महाराजांचे दर्शन 

विजय वडेट्टीवार यांनी गावाशी नाळ कधीच तोडली नाही. 2010 मध्ये करंजी गावात महापूर आला होता. अशावेळी त्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन मदतीचा हात दिला. अगदी काही दिवसांपूर्वी राजकारणात सक्रिय झालेल्या त्यांच्या कन्या शिवाणी व त्यांचा भाऊ किशोर वडेट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर करंजी गावाला भेट देत अनेकांशी संवाद साधला. तसेच धाबा येथील संत कोंडया महाराज देवस्थानात महाराजांचे आशीर्वाद घेतले. 

विजय वडेट्टीवार माझे वर्गमित्र होते. तेव्हापासूनच त्यांच्यात कमालीची नेतृत्वक्षमता होती. प्रचंड संघर्षातून ते यशाचे एक एक शिखर गाठीत आहेत. एक मित्र म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. 
सुभाष घिवे, करंजी. 

विजय वडेटटीवार यांचा संघर्ष मी अगदी जवळून बघितला आहे. त्यांच्या प्रत्येक घडामोडीचा मी साक्षीदार आहे. 
सुरेश श्रीवास्कर, ज्येष्ठ कार्यकर्ता, सेवादल कॉंग्रेस 

आमच्या गावचे भूमिपुत्र विजय वडेटटीवार यांची कॅबीनेट मंत्रीपदी निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाचा जिल्ह्याच्या विकासासह तालुक्‍याच्या विकासालाही मोठा हातभार लाभेल. 
अखिल ताडशेट्टीवार, गोंडपिपरी 
 

loading image