esakal | कधी होणार सत्यकरण देवस्थानाचा विकास?...मिळावा पर्यटनस्थळाचा दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

सडक अर्जुनी : पहाडीवरील सत्यकरण देवस्थान.

सत्यकरण पहाडीवर गेल्या एक शतकापासून दरवर्षी पितृमोक्ष अमावास्येनंतर येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारी यात्रा भरते. ही यात्रा देवदसरा म्हणून ओळखली जाते. सडक अर्जुनी तालुक्‍यातील बकी येथील गणाबापू मोकाशी यांनी इंग्रजांच्या राजवटीत या मंदिराची मुहुर्तमेढ रोवली होती. निसर्गरम्य वातावरणात सत्यकरण देवस्थान आहे.

कधी होणार सत्यकरण देवस्थानाचा विकास?...मिळावा पर्यटनस्थळाचा दर्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील निसर्गरम्य सत्यकरण पहाडीवरील देवस्थान सौंदर्यीकरणापासून वंचित आहे. हे देवस्थान विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आदिवासींचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

सत्यकरण पहाडीवर गेल्या एक शतकापासून दरवर्षी पितृमोक्ष अमावास्येनंतर येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारी यात्रा भरते. ही यात्रा देवदसरा म्हणून ओळखली जाते. सडक अर्जुनी तालुक्‍यातील बकी येथील गणाबापू मोकाशी यांनी इंग्रजांच्या राजवटीत या मंदिराची मुहुर्तमेढ रोवली होती. निसर्गरम्य वातावरणात सत्यकरण देवस्थान आहे.

या पहाडावर गुरुबाबा, राजीमा कोल्हासूर, भुराजी, खामदेव, अन्नपूर्णा, महावीर, सूर्यादेव, मांडोबाई, गायकी, बलकी, घाटमाऱ्या, ऋषीकेशी, पुजारीदेव, वाघदेव आदी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी चिखली, बानटोला, मोगरा या परिसरातील आदिवासी बांधव पूजा करतात. या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा, चैत्र रामनवमीच्या वेळीसुद्धा यात्रा भरते.

विश्रांतीस्थळाची निर्मिती

यात्रेमध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. सत्यकरण पहाडावर शालेय विद्यार्थी वनभोजनासाठी येतात. देवस्थानाजवळील मुख्य रस्त्याच्या दक्षिणेला छोटासा नाला वाहतो. बंधाऱ्याअभावी तो कोरडाच राहतो.
देवरी येथील शिवाजीराव पाठक यांनी भाविक आणि पर्यटकांच्या विश्रांतीसाठी येथे भक्तांगण या विश्रांतीस्थळाची निर्मिती करून दिली आहे.

हेही वाचा : (Video) धान्याच्या शेडवर भाजीविक्रेत्यांचा ताबा; वाढल्या या समस्या

शासनाने या स्थळाचे सौंदर्यीकरण करावे

हे एक निसर्गरम्य स्थळ आहे. हे क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यापासून उपेक्षित आहे. या स्थळाचे सौंदर्यीकरण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाने या स्थळाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.