कुठे शेतकऱ्याचा बांध... आम्हा तर क्रिकेटचा नाद!

आमदारांचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने आता टीकेची राळ उठली आहे.
yavatmal
yavatmalsakal

पुसद (जि. यवतमाळ) : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला असताना त्यांचे शेताच्या बांधावर सांत्वन करण्याऐवजीपुसदच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन क्रिकेट शौकीन आमदारांनी क्रिकेट मॅचचा आनंद लुटण्यासाठी थेट दुबई गाठली.दुबईच्या स्टेडियम मधील क्रिकेटचा आस्वाद घेणाऱ्या या आमदारांचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने आता टीकेची राळ उठली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकाचे अतिवृष्टी व परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी विचित्र परिस्थितीत सापडले आहेत.हातचे पीक गेल्याने आपले हात शेतकऱ्यांनी कपाळाला लावले आहेत.लोकप्रतिनिधींनी अशावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याची गरज आहे.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.दसऱ्यानंतर दिवाळी पुढ्यात आली आहे.दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. लोकप्रतिनिधींनी अशावेळी सरकार दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून दिलासा देण्याची गरज आहे.मात्र लोकप्रतिनिधीच अशा संकटसमयी क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी दुबई सारख्या देशात जात असतील तर ? शेतकऱ्यांनी कुणाकडे पहावे,असा प्रश्न विचारला जात आहे.

पुसद येथील आमदार इंद्रनील नाईक,आमदार डॉ. वजाहत मिर्झा हे त्यांच्या मित्रांसमवेत रविवारी दुबईच्या स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहताना मोबाईलवर कॅमेराबद्ध झाले आणि हा फोटो व्हाट्सअप ग्रुप वरून व्हायरल झाला.त्यावर कॉमेंटचा पाऊस पडू लागला." कुठे शेतकऱ्याचा बांध...आम्हा तर क्रिकेटचा नाद ! " अशी टीका होऊ लागली.डिजिटल मीडियावर चर्चा झडू लागली.बरेचदा हे आमदार क्रिकेट पाहण्यासाठी श्रीलंका व इतर बाहेरील देशात वेळोवेळी जाऊन आले आहेत.

मात्र ही वेळ दुबई ऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर सांत्वन करण्याची असताना टीकेची झोड उठवण्याची भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयतीच संधी मिळाली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी समाज माध्यमातून या आमदारांच्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी लोकप्रतिनिधींनी कोणत्या परिस्थितीत कसे वागावे,याचे आपल्या संतप्त प्रतिक्रियेतून धडे दिले.एक मात्र झाले,पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि टीकेची झोड मात्र, पुसदच्या दुबईतील आमदारांवर उडविण्यात आली.आमदार झाले म्हणून काय झाले,त्यांनाही व्यक्तिगत जीवन असतेच,असे समर्थन करतानाच कुठल्या परिस्थितीत कसे भान ठेवावे,याचा सल्लाही नेटकरी मंडळींनी आमदारांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com