विद्यार्थ्यांच्या जिद्दीला कष्टाचे फळ… मोबाईल कव्हरेज मिळेल तिथे होतो अभ्यास

दीपक फुलबांधे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठी शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन स्टडी ग्रुप तयार केले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू आहे. शिक्षकांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियमितपणे पाठ शिकवले जातात. परंतु, शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क नसल्याने मुलांना अभ्यास करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भंडारा : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन घोषित केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने शाळा बंदच ठेवल्या असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. मात्र, मोबाईल नेटवर्कमध्ये वारंवार खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईल कव्हरेज तिथे मिळेल, तिथे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे.

ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठी शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन स्टडी ग्रुप तयार केले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू आहे. काही ठिकाणी शिक्षक सुशिक्षित युवकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. कोरोना संकटामुळे विद्यार्थी विनाशाळा हा उपक्रम सुरू झालेला आहे. यात मुले घरच्या घरी सराव करून अवघड प्रश्‍नांबाबत शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात.

परंतु, अभ्यासाच्या ठिकाणातील गजबज, गोंधळ झाल्यास त्यांचे लक्ष विचलित होते. मात्र ऑनलाइन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. तसेच ठरलेल्या वेळापत्रकानुसार वाचन, लेखनावरही भर दिला जात आहे. मात्र, या सर्वांत मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठ्याचा प्रभाव पडत आहे.

 

नेटवर्कचा अभ्यासावर परिणाम

शिक्षकांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियमितपणे पाठ शिकवले जातात. परंतु, शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क नसल्याने मुलांना अभ्यास करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच वेळा घरी नेटवर्क नसल्याने मुले घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी, सभागृह व इतर ठिकाणी ऑनलाइन अभ्यासात गुंतलेले दिसतात. कुठे उंच ठिकाणी तर, कुठे छतावरही अभ्यास सुरू आहे. मात्र, माध्यमिक वर्गातील बऱ्याच मुलांना अँड्राईड मोबाईलची अडचण जाणवत आहे.

आता शिक्षकांवर जबाबदारी

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेचे नाते दूर जात असताना विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातच राहतील, याची काळजी घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. तेव्हाच आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक घडू शकतो. यासाठी त्याचे अभ्यासात सातत्य आवश्‍यक आहे.

जाणून घ्या : बेरोजगारीवर मात करीत त्याने फुलवली भाजीपाल्याची शेती...इतर शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा

मोबाईल नेटवर्कमुळे नागरिक त्रस्त

निलज बु. : सगळीकडे डिजिटल इंडिया विषयावर चर्चा चालू असताना गावात राहणाऱ्या नागरिकांना फोनवर नेटवर्कसाठी संघर्ष करावा लागत आहे. परिसरात संथगतीने चालणाऱ्या इंटरनेट स्पीडमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोविड -19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन आभासी स्वरूपात वर्ग चालू आहेत. परंतु, इंटरनेटच्या संथ गतीने विद्यार्थ्यांसाठी असुविधा होत आहे. परिसरातील नागरिकांनी मोबाईल नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
 

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where there is coverage, there is student study