.. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का? 

who is responsible for historic flood in vidarbha read full story
who is responsible for historic flood in vidarbha read full story

भंडारा / गडचिरोली :  गेल्या काही दिवसांपासून 'बिन बादल बरसात' अशी परिस्थिती नागपूरसह विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यांमधील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. इतकेच नाही तर नागपूर आणि विदर्भात १९९४ नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे. पण पाऊस नसतानाही इतका मोठा पूर आला कसा? आणि या महापुराला रोखता आले असते का? 

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर सतत पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र या थोड्याथोडक्या पावसामुळे खोसेखुर्द, पेंच, तोतलाडोह, अप्पर वर्धा यासारखी विदर्भातील मोठी धरणे भरली. या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला . पण या धरणांतून खरंच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती का? हा सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण होतोय. 

हवामान विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार  पाऊस झाला. त्यानंतर पावसाची रिपरिप धरण परिसरात सुरूच होती. या पावसामुळे धरणांध्ये पाण्याची पातळी वाढली. मात्र धरणाचे दरवाजे उघडावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.   

मध्यप्रदेशातून विदर्भात पाणी

याच दरम्यान मध्यप्रदेशात हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा खरा ठरला. अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे धरणसाठा वाढला. संजय गांधी सरोवरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे विदर्भातील पेंच, वैनगंगा या नद्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले. त्यामुळे पेंच धरणाची पातळी वाढू लागली. त्या पाठोपाठ तोतलाडोह आणि गोसेखुर्द धरणांमध्येही पाणी वाढू लागले. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. 

सूचना देऊनही दुर्लक्ष? 

संजय गांधी सरोवरातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे याबद्दलची सूचना आधीच देण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. असे असेल तर याबद्दल स्थानिकांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही. धरणात पाणीसाठी किती आहे आणि कधी धरणातून पाण्याचा विसर्ग कधी, किती प्रमाणात करण्यात येईल याबद्दल का सांगण्यात आले नाही? हेच प्रश्न उपस्थित होतात. 

ऐतिहासिक विसर्ग

पेंच, अप्पर वर्धा, तोतलाडोह, गोसेखुर्द या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरु झाला. मात्र यामध्ये सर्वात जास्त विसर्ग गोसेखुर्द धरणातून करण्यात येत होता. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येणार आहे याबद्दल स्थानिकांना सूचनाच नव्हती. धरण प्रशासनाने विसर्ग केला खरा मात्र याचा फटका गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना बसला.

महापुराला रोखता आले असते? 

धरण प्रशासनाला सूचना मिळताच जर योग्य तो निर्णय घेऊन पाण्याचा थोड्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला असता तर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची वेळ आली नसती आणि विदर्भाचा महापुरापासून बचाव करता आला असता असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गडचिरोलीला गोसेखुर्दचा फटका .

गेल्या काही दिवसात गडचिरोलीला पूर परिस्थिती निर्माण होईल असा पाऊस झाला नाही. मात्र भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल २० हजार क्युसेकपेक्षा जास्त प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे अख्खा गडचिरोली जिल्हा महापुराच्या संकटात सापडला. विशेष म्हणजे ज्या गावांना आजपर्यंत पुराचा फटका बसला नव्हता त्या गावांनाही या महापुराने धुवून काढले. 

अखेर पूर ओसरला

पूरग्रस्त भंडारा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये आता पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. गोसेखुर्द धरणातून आता पाण्याचा विसर्गही ५००० क्युसेक करण्यात आला आहे. मात्र उध्वस्त झालेले जनजीवन पुन्हा सुस्थितीत येण्यास वेळ लागेल यात शंका नाही. पण अनेकांच्या मनात प्रश्न अजूनही कायम आहे. पूर रोखता आला असता का?

नियोजनशून्य कारभार 
२९ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातून पाणी सोडण्यात आले तशी सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात अली होती. ३६ तासांत हे पाणी भंडारा जिल्ह्यात येते. एवढा वेळ प्रशासनाकडे होता. मात्र प्रशासनाने कुठल्याही उपाय योजना केल्या नाहीत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यातील नागरिक संकटात सापडले आहेत.
सुनील मेंढे,
खासदार, भंडारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com