नक्षलवाद्यांनी का केले 20 मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन...हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या असलेली सृजनक्का 2 मे रोजी सिनभट्टी गावालगतच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमकीत ठार झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सृजनक्‍काला ठार केल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. या घटनेचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी येत्या 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

कोरची (जि. गडचिरोली) : गेल्या शनिवारी (ता. 2) एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी गावालगतच्या जंगलात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत गडचिरोली विभागीय समितीची सदस्य तथा जहाल नक्षलवादी सृजनक्का मारली गेली. या घटनेचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी येत्या 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

असे आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रके शनिवारी (ता. 9) कोरची तालुक्‍यातील कोटगूल परिसरात आढळून आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे.

सृजनक्‍काला ठार केल्याचा संशय

नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या असलेली सृजनक्का 2 मे रोजी सिनभट्टी गावालगतच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमकीत ठार झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सृजनक्‍काला ठार केल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. त्यामुळे त्यांना मोठा धक्‍काही बसला होता. पण, सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्याच्या मोहिमेवर सृजनक्‍का होती. पोलिसांनी तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले, अशी अजब व हास्यास्पद माहिती नक्षलवाद्यांनी या पत्रकात नमूद केली आहे.

जाणून घ्या : अटी, शर्थींचे पालन करत उघडण्यात आली गडचिरोलीची बाजारपेठ

सर्वांनी बंद पाळावा; पत्रकात उल्लेख

पोलिसांनी अनेक निरपराध नागरिकांना ठार केल्याचा आरोपही नक्षलवाद्यांनी केला आहे. सृजनक्‍काच्या मृत्यूचा निषेध म्हणून सर्वांनी बंद पाळावा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. पत्रकाच्या शेवटी नक्षलवाद्यांच्या भाकपा (माओवादी) उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव पवन याचे नाव लिहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Naxals call for Gadchiroli Bandh on May 20?

Tags
टॉपिकस
Topic Tags: