का केला नवदाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न...वाचा सविस्तर

गडचिरोली : वरगंटीवार यांचे घर.
गडचिरोली : वरगंटीवार यांचे घर.

गडचिरोली : मुलीन प्रेमविवाह केल्याने वरगंटीवार कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर अमिर्झा गावात शोकाकुल वातावरणात मंगळवारी (ता. 11) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संतप्त आई, वडील आणि भावाने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली होती. ही धक्कादायक घटना गडचिरोलीतील आनंदनगर येथे सोमवारी (ता. 10) दुपारी उघडकीस आली.

वडील रवींद्र वरगंटीवार, आई वैशाली व भाऊ साईराम वरगंटीवार यांनी मुलीने अन्य समाजातील मुलाशी लग्न केल्याने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी नवदाम्पत्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

आईवडील राहत होते भाड्याच्या घरात

रवींद्र वरगंटीवार हे गडचिरोली तालुक्‍यातील अमिर्झा गावातील रहिवासी होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते वर्षभरापूवी गडचिरोली येथील आनंदनगर येथे शरद पोटवार यांच्या घरी भाड्याने राहात होते. त्यांची पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात रोजनदारीच्या कामावर होती. मुलगा शासकीय इंग्रजी आश्रमशाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होता; तर, मुलगी पोलिस संकुल येथील सरस्वती विद्यालयात तासिका शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

मुलीच्या नातेवाइकांनी दिला नकार

दरम्यानच्या काळात मुलीचे पोलिस मुख्यालयात कार्यरत एका युवकाशी सूत जुळले. मुलाच्या आई, वडिलांच्या कानावर प्रेमप्रकरणाची माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी रवींद्र वरगंटीवार यांच्याकडे मुलीसाठी मागणी घातली. मात्र, जातीच्या अडथळ्यामुळे मुलीच्या नातेवाइकांनी नकार दिला. यामुळे दोन्ही कुटुंब मागील काही दिवसापासून अस्वस्थ होते.

मुलीने केला प्रेमविवाह

दरम्यान आठ फेब्रुवारीला मुलाने आपल्या प्रेयसीला घेऊन मार्कंडा येथील मंदिरात लग्न केले. त्यानंतर सायंकाळी परत वरगंटीवार यांच्या घरी जाऊन लग्न थाटामाटात करण्याबाबत बोलणी केली. याला मुलीच्या आईने दुजोरासुद्धा दिला होता. परंतु, सोमवारी अचानक आई, वडील आणि भावाने टोकाची भूमिका घेत विहिरी उडी घेऊन आत्महत्या केली.

साइरामनेही पाठविला मॅसेज

तत्पूवी साईरामने आपल्या मोबाईलवर नातेवाइकांना एसएमएस करून आत्महत्येची माहिती दिली होती. त्यानंतर मोबाईल बंद करून "त्या' तिघांनी विहिरीत आत्महत्या केली.

एसएमएस बघून वरगंटीवार यांच्या नातेवाइकांनी आनंदनगर येथे धाव घेतली. यावेळी घरी कोणीच नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दुपारी शोधाशोध केल्यानंतर सेमाना देवस्थान लगतच्या एका विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. आपल्या कुटुंबातील सामूहिक आत्महत्येची बातमी कळताच मुलगी आणि जावयाला मोठा धक्का बसला.

असे का घडले? : मुलीच्या पळून जाण्याने तिघांनीही उचलले टोकाचे पाऊल...

आत्महत्या करण्याचा पाठविला एसएमएस

त्यांच्या आत्महत्येला आम्हालाच जबाबदार धरतील, अशा शंकेने व्यथित झालेले दोघेही दुपारी मोटरसायकलने चिचडोह प्रकल्पाकडे निघाले. तत्पूर्वी युवकाने आपल्या नातेवाइकाला आत्महत्या करीत असल्याचा एसएमएस पाठविला होता. हा मॅसेच बघताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन "त्या' दोघांना ताब्यात घेतले. तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com