कुठे हरवताहेत काजव्यांची झाडे? का लुप्त होतोय काजव्यांचा इवलासा प्रकाश? घ्या जाणून

मिलिंद उमरे
Tuesday, 1 September 2020

निसर्गात काजवा हा अतिशय चमत्कारी जीव आहे. या लुकलुकणाऱ्या जिवांच्या अनेक प्रजाती भारतासोबतच दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्येही आढळतात. गंमत म्हणजे या स्वयंप्रकाशित कीटकांच्या चक्‍क दोन हजाराहून अधिक प्रजाती शोधण्यात आल्या आहेत.

गडचिरोली : पूर्वी पावसाळ्याच्या दिवसांतील अंधाऱ्या रात्री काजव्यांच्या असायच्या. अंधारात घराबाहेर, रानात किंवा एखाद्या डोंगरावर, तलावाकाठच्या झाडांकडे बघितलं की, झाडांवर असंख्य काजवे लुकलुकताना दिसायचे. पण, आता ही काजव्यांची अंधारातली पाचूसारखी रत्नवर्णी चमक मंदावत चालली आहे. पर्यावरणातील विपरीत परिणामांमुळे तसेच जंगले आक्रसत असल्याने काजव्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

निसर्गात काजवा हा अतिशय चमत्कारी जीव आहे. या लुकलुकणाऱ्या जिवांच्या अनेक प्रजाती भारतासोबतच दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्येही आढळतात. गंमत म्हणजे या स्वयंप्रकाशित कीटकांच्या चक्‍क दोन हजाराहून अधिक प्रजाती शोधण्यात आल्या आहेत. काजवा रात्री सुंदर दिसत असला, तरी त्याला दिवसा पाहिले तर सूर्याच्या प्रकाशात त्याचा इवलासा प्रकाश दिसतच नाही. तो पातळ, चपटा, राखाडी, तपकिरी रंगाचा सामान्य कीटक दिसतो. विशेष म्हणजे नरांना पंख असतात, तर माद्यांना नसतात. मादी चमकते पण एकाच ठिकाणी बसून असते. काजव्यांचे डोळे मोठे, स्पर्शक लांब व पाय छोटे असतात.

साधारणत: पावसाळ्यात जून महिन्यात यांचा विणीचा हंगाम असल्याने या काळात काजवे अधिक संख्येने दिसतात. मिलनानंतर काही दिवसांनी मादी जमिनीत किंवा झाडांच्या सालीत अंडी घालते. त्यातून यांच्या अळ्या बाहेर पडून पुढे त्यांचे काजवे होतात. काजव्यांच्या शरीरात काही विशिष्ट रसायने असतात. ही रसायने ऑक्‍सिजनच्या संपर्कात येताच प्रकाश निर्माण होतो. मात्र, हा स्वयंप्रकाशित कीटक आपल्या अस्तित्वासाठी झुंजताना दिसतो आहे. पूर्वी मोठ्या संख्येने काजवे असलेल्या झाडांना काजव्यांची झाडे म्हटले जायचे. पण आता ही काजव्यांची झाडेच कमी होत आहेत.

सविस्तर वाचा -  चोराच्या हाताला दोर बांधून पोलिस रंगले गप्पांमध्ये; गुंगारा देऊन पसार झाल्यानंतर

कृत्रिम प्रकाशाशी स्पर्धा...
पूर्वी मोजक्‍या शहरांमध्ये पथदिवे असायचे. आता अगदी दुर्गम भागांत, गावांच्या वेशीपर्यंत इलेक्‍ट्रिकचे दिवे असतात. या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशात काजव्यांचा इवलासा प्रकाश गुडूप होतो. आता या कृत्रिम प्रकाशाशी त्यांची स्पर्धा असल्यानेही काजवे जवळ असले, तरी ते दिसत नाहीत.

आधी मांसाहारी, मग शाकाहारी...
काजव्यांच्या पिल्लांचा सुरुवातीचा मुख्य आहार गोगलगाय असतो. ते आधी गोगलगायींवरच पोसले जातात. पण, एकदा त्यांचे प्रौढ काजव्यात रूपांतर झाले की, मग चक्‍क शाकाहारी होऊन पाने, फुले, फुलातील परागकण खातात. हा त्यांच्या जीवनचक्राचा गमतीशीर पण विलक्षण भाग आहे.
हेसुद्धा चमकतात बरं...
काजव्यांप्रमाणेच काही जिवाणू, मासोळ्या, काही प्रजातीचे शैवाल, काही प्रकारच्या गोगलगायी, खेकडे व कीटकांमध्ये प्रकाश निर्माण करण्याचा गुण असल्याचे आढळून आले आहे. बुरशीच्या काही दुर्मिळ प्रजाती व पावसाळ्यात उगवणाऱ्या काही कुत्र्याच्या छत्र्यांमध्येही प्रकाश निर्मितीची क्षमता असते. पण, या सर्वांत लक्षात राहणारा व आवडीचा कीटक काजवाच आहे.
--------------------------

Remarks :

संपादन -स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why do fireflies disappear?