का झापले असेल आमदारांनी तलाठ्यांना...वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

आमदार वानखडे यांनी विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट व त्रास यावरून आक्रमक भूमिका घेत अंजनगाव येथील तलाठ्यांना चांगलेच धारेवर धरत शेतकऱ्यांना त्रास देत उद्धट वागणूक दिल्यास सहन करणार नाही, अशी तंबी दिली. 

दर्यापूर (जि. अमरावती) : महसूल व वनविभाग यांचे उपविभागीय महाराजस्व अभियान शहरातील गुरुकृपा मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. 14) आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला महाराजस्व अभियानाचे उद्‌घाटन आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना त्रास दिल्याच्या कारणावरून आमदारांनी तलाठ्यांना धारेवर धरून कार्यवाहीची तंबी दिली. 

दरम्यान, प्रातिनिधिक स्वरूपात कुटुंब अर्थसहाय्य मदत, घराची पडझड, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण तसेच नवीण शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आदेशपत्रांचे वाटप आमदार वानखडे व मान्यंवराच्या हस्ते करण्यात आले. 

यांची होती उपस्थिती 

या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जि. प. सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, वंदना करुले, पं. स. सभापती नंदिनी थोटे, उपसभापती रेखा साखरे, माजी सभापती गजानन देवतळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, अंजनगावचे तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, गटविकास अधिकारी नंदकिशोर धारगे, तुकाराम भालके, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता चेतन मोहोकार आदी उपस्थित होते. 

तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस 

आमदार वानखडे यांनी विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट व त्रास यावरून आक्रमक भूमिका घेत अंजनगाव येथील तलाठ्यांना चांगलेच धारेवर धरत शेतकऱ्यांना त्रास देत उद्धट वागणूक दिल्यास सहन करणार नाही, अशी तंबी दिली. तसेच अनुपस्थित तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून एक दिवसाचा पगार न काढण्याचे आदेश दिले. 

सविस्तर वाचा : आता पोलीस दलात हजारोंना संधी

प्रामाणिकपणे काम करा

दरम्यान नानाजी देशमुख, संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, वीज वितरण आदी विभागांचा आढावा घेऊन काही अडचणी असल्यास सांगा, प्रामाणिकपणे काम केल्यास मी सदैव पाठीशी असल्याचेही आमदार वानखडे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्‍वनाथ घुगे यांनी, तर संचालन विजय वाघमारे यांनी केले. आभार तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why MLA angry on Talathis at amravati