वर्ध्यात सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री; अन्न व औषधी प्रशासनाची डोळेझाक

टीम ईसकाळ
Sunday, 6 December 2020

वर्ध्यात आलेला सुगंधित तंबाखू रातोरात संबंधितांकडे पोहोचविण्याकरिता एक वेगळीच यंत्रणा कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याची माहिती येथील अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे फावत आहे.

वर्धा : शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी आणली आहे. या बंदी असलेल्या तंबाखूची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकारी अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. असे असताना येथील वर्ध्यात या प्रतिबंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षाचे कारण मात्र समजण्यापलीकडचे आहे.

कोरोना काळात शासनाकडून सुगंधित तंबाखूची विक्री बंद करण्याच्या सूचना करण्यात आला. वास्तवात कोरोना काळापूर्वीपासूनच या तंबाखूवर बंदी आहे. पण या काळात आरोग्याची काळजी म्हणून या शासनाने नियम अधिक कठोर केले होते. सध्या कोरोना संसर्ग कायम आहे, अशा काळात या तंबाखूची विक्री होणे अपेक्षित नसताना वर्ध्यात खुलेआम त्याची विक्री सुरू आहे. याची माहिती या विभागाला नाही असेही नाही. माहिती असताना त्याच्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे.

पान मटेरिअल सप्लाय करणारी अनेक दुकाने वर्ध्यात आहेत. यात मोठी काही दुकाने बसस्थानकासमोरच्या बोळीत आहेत. येथे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या तंबाखूचा पुरवठा होता. असाच पुरवठा करणारे अनेक व्यापारी आठही तालुक्‍यात आहेत.

अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

वर्ध्यात आलेला सुगंधित तंबाखू रातोरात संबंधितांकडे पोहोचविण्याकरिता एक वेगळीच यंत्रणा कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याची माहिती येथील अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे फावत आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा हा व्यापार करणाऱ्यांकडूनच होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे सुरू असलेल्या या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पानटपरीच्या मागे खर्रा निर्मितीचे कारखाने

सुगंधित तंबाखूपासून निर्मित होत असलेला खर्रा विक्रीवर शासनाकडून बंदी आणण्यात आली. या बंदीनंतर वर्ध्याच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने काही खर्रा निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. अनेक ठिकाणी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे खर्रा विक्रेत्यांना दुसरे व्यवसाय सुरू करावे लागले होते. पण आता तर शहरात अनेक ठिकाणी पुन्हा राजरोसपणे खर्रा निर्मितीचे कारखाने सुुरू करण्यात आले आहे. त्यातून मोठी उलाढाल होत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत पुन्हा कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जाणून घ्या : सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरही धोक्यात; शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला

पानटपऱ्यांवर तरुणांचे घोळके

सध्या महाविद्यालयाला सुटी असल्याने अनेक विद्यालयातील विद्यार्थी पानटपऱ्यांवरच असल्याचे दिसते. यातून अनेक अवैध प्रकार येथे सुरू असल्याचे बोलले जात आहे. यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनासह पोलिस विभागाकडूनही कारवाई होणे अपेक्षित आहे.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Widespread sale of aromatic tobacco in Wardha