esakal | लॉकडाउनमुळे तेलंगणात अडकलेल्या पत्नी, वडिलांनी फोडला हंबरडा; इकडे दोन चिमुकल्यांनी केला पित्यावर अंत्यसंस्कार... 
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Pendalwar

उपरी येथील नरेंद्र पत्रुजी पेंडलवार (वय 35) यांचे शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी निधन झाले. मात्र, लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकलेल्या पत्नी आणि वडिलांच्या गैरहजेरीत नरेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लॉकडाउनमुळे तेलंगणात अडकलेल्या पत्नी, वडिलांनी फोडला हंबरडा; इकडे दोन चिमुकल्यांनी केला पित्यावर अंत्यसंस्कार... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साखरी/सावली (जि. चंद्रपूर) : प्रेमासाठी घरदार सोडले. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावला. मिळेल ते काम करून जगणे सुरू होते. मात्र, सात जन्म सोबत राहण्याचे वचन मोडून पती अर्ध्यावरच जग सोडून गेला. तेव्हा ती मिरचीतोड कामगार म्हणून तेलंगणात सासऱ्यांसोबत होती. लॉकडाऊनमध्ये दोघेही तिथेच अडकले. पत्नीला पतीचे आणि वडिलांना मुलाचे अखेरचे दर्शन घेता आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत चिताग्नी देण्यात आली. काळजी हेलावून टाकणारी ही घटना सावली तालुक्‍यातील उपरी गावातील. 

अवश्य वाचा- तिला जंगलात एकटीला बघून त्याने घातली झडप, अन् घडले असे...

उपरी येथील नरेंद्र पत्रुजी पेंडलवार (वय 35) यांचे शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी निधन झाले. मात्र, लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकलेल्या पत्नी आणि वडिलांच्या गैरहजेरीत नरेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्रचे 13 वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील अश्‍विनी हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. ते एका जातीचे नव्हते. त्यामुळे अश्‍विनीच्या कुटुंबीयांकडून तेव्हा विरोध झाला. मात्र, विरोध झुगारून त्यांनी लग्न केले. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे संसार चालविण्यासाठी अश्‍विनी हातभार लावायची. घरी दोन मुलांसोबतच सासू आणि सासऱ्याची जबाबदारी नरेंद्र आणि अश्‍विनीच्या खांद्यावर होती. या भागातील शेकडो मजूर दरवर्षी तेलंगणात मिरचीतोड कामगार म्हणून जातात. अश्‍विनी आपल्या सासऱ्यांसोबत तिथे गेली. मात्र, कोरोनाचे वादळ उठले. देशात टाळेबंदी आणि संचारबंदी सुरू झाली. वाहतुकीची साधनं ठप्प झाली. त्यामुळे अश्‍विनी आणि नरेंद्रचे वडील तिकडेच अडकले. इकडे आठ दिवसांपूर्वी नरेंद्रची प्रकृती बिघडली. त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. तो उपरी येथील आपल्या घरी परतला. मात्र, पुन्हा प्रकृती खालावली. 

नरेंद्रच्या निधनाचे समजताच दोघांनीही फोडला हंबरडा

शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल केले. मात्र, सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. पतीचे निधन झाल्याची बातमी पत्नीपर्यंत पोहोचली. तिच्यासोबत तिचे सासरेही होते. या दोघांनीही हंबरडा फोडला. परंतु त्यांचे सांत्वन करायलाही तिथे कुणी नव्हते. शेवटी अश्रूही आटले आणि इकडे नरेंद्रवर शनिवारी, 18 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार पार पडले. दोन लहान मुलांनी पित्याला चिताग्नी दिला. त्यावेळी फक्त रक्ताच्या नात्यातील आजी या दोन चिमुकल्यांसोबत होती. सावली तालुक्‍यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. या भागातील शेकडो मजूर तेलंगणात अडकले आहे.