तिला जंगलात एकटीला बघून त्याने घातली झडप, अन्‌ घडले असे... 

Tiger
Tiger

तिरोडा (जि. गोंदिया) : मंगेझरी लगतच्या जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शनिवारी (ता. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. अनिता सुशीत तुमसरे (वय 32, रा. मंगेझरी) असे मृताचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्‍यातील जंगलव्याप्त गावांमध्ये वाघ, बिबट्याची दहशत आहे. आजच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सुकडी, आलेझरी, बालापूर, डोंगरगाव, रुस्तमपूर, बुचाटोला, कोडेबर्रा व मंगेझरी ही गावे नागझिरा अभयारण्याला लागून आहेत. त्यामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्या व वाघाने धुमाकूळ घातला आहे. आज, शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास मंगेझरी येथील अनिता तुमसरे ही महिला मंगेझरी संरक्षित वनकक्ष क्रमांक 56 येथे मोहफुले वेचण्याकरिता गेली होती. याचवेळी सकाळी साडेसहाच्या सुमारास पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने तिचे शरीर अंदाजे 400 मीटर अंतर ओढत राखीव वन कक्ष क्रमांक 108 मंगेझरी येथे आणले. परंतु, नागरिकांनी आरडाओरड केल्याने मृत शरीर जागीच सोडून वाघ जंगलात निघून गेला. घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे व इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. 

बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त

मृताच्या वारसदारांना शासनाकडून शासन तरतुदीनुसार 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून देय असून आज तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे तालुक्‍यातील लोणारा, नवेझरीतील परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन भांबावून गेले आहे. यातच लोणारा येथील भागवत सलामे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना काल, शुक्रवारी घडली. शिवाय मुंडीकोटा परिसरात सरांडी, धादरी, उमरी, सालेबर्डी या गावांत रानडुकरांनी अगोदर खरीप आणि आता रब्बीपिकांचे अतोनात नुकसान केले. 
मुंडीकोटा येथील शेतकरी गणेश मेश्राम यांच्यावर काही दिवसांपूर्वी रानडुकराने हल्ला करून जखमी केले. दरम्यान, तालुक्‍यातील जंगलव्याप्त गावांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढला असून, वनविभागाने ताबडतोब उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. 

जंगलव्याप्त भागात वाघ व बिबट्याचा हैदोस वाढला आहे. या वन्यप्राण्यांपासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता सरपंच व पोलिस पाटील यांच्यासोबत प्रत्येक घरी जनजागृती करीत आहोत. नागरिकांनी सतर्क राहून जंगलात जाणे टाळावे. 
- शेषराज आकरे, वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग तिरोडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com