"साहेब, धान कापणीसाठी शेतात कसं जाणार? हिंस्त्रप्राणी बघताहेत वाट"; बळीराजावर आणखीन एक संकट   

विनायक रेकलवार
Sunday, 8 November 2020

जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, नागभीड आणि पोंभुर्णा हे तालुके धानउत्पादक पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागांत आता मोठ्या जोमात धान कापणीचा हंगाम सुरू आहे.

मूल (जि, चंद्रपूर) ः जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. चांगला पाऊस झाल्याने धानाचे पीक चांगल्या स्थितीत आहे. सध्या धानपट्ट्यात धान कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, धानपट्ट्यातील मूल, सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी यासह अन्य भागांतील शेतशिवारातच वाघोबासह अस्वल, रानडुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे धान कापणी करायची तरी कशी असा प्रश्‍न धान उत्पादकांना पडला आहे. त्यासोबतच वाघ, रानडुकरांसारखे प्राणी शेतात असताना शेतात जायचं कसं असा प्रश्न शेतकरी करताहेत. 

जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, नागभीड आणि पोंभुर्णा हे तालुके धानउत्पादक पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागांत आता मोठ्या जोमात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. हाती आलेले पीक कापणीवर असताना या पट्ट्यांत हिंस्त्रप्राण्यांचा वावर वाढला आहे. रविवारी मूल तालुक्‍यातील बोरचांदली येथे धान कापी करीत असलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले.

क्लिक करा- आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून 

गौतमाबाई खोब्रागडे असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी उमा नदीकाठावरील या भागात वाघाचे पगमार्क दिसून आले होते. मूल तालुक्‍यातील करवन, काटवन या बफर क्षेत्रात दिवसाढवळया वाघाचे दर्शन होत आहे. कधी वाघ रस्त्यावर ठाण मांडून बसलेला आढळून येतो, तर कधी शेतात त्याचे पगमार्क दिसून येत आहे. 

परिसरातील शेतकरी चिंतातूर आहे. ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्‍यातील जंगलालगत असलेल्या गावांतही वाघाचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच दोन गुराख्यांवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

धान कापणीवर हिंस्त्र प्राण्यांचे मोठे सावट आहे. आजच माझ्या शेतातील एका शेतमजूर महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. वाघ,अस्वल आणि रानडुकरांची मोठी दहशत आहे. वनविभागाला सांगूनही लक्ष दयायला कोणी तयार नाही.
वसंतराव ताजने,
 शेतकरी,मूल.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild animals are entering in rice farms