esakal | हिंस्र प्राण्यांचा धोका, घनदाट जंगल अन्‌ रात्रीचा पायी प्रवास...काय ही हिंमत? 
sakal

बोलून बातमी शोधा

Mirchi labor

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मजुरांना मिरचीच्या शेतावरच मुक्कामाने ठेवले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यामुळे मजुरांच्या झोपड्‌या कोसळल्याने मजुरांना निवाऱ्याची तसेच अन्नधान्याची चणचण जाणवू लागली. त्यामुळे हजारो मजुरांनी रात्रीच्या वेळी गोदावरी नदीचे पात्र पार करून आपापल्या गावाची वाट धरली आहे.

हिंस्र प्राण्यांचा धोका, घनदाट जंगल अन्‌ रात्रीचा पायी प्रवास...काय ही हिंमत? 

sakal_logo
By
तिरुपती चिट्याला

गडचिरोली : तेलंगणा राज्यात मिरची तोडाईच्या कामासाठी गेलेले हजारो मजूर आपला जीव धोक्‍यात घालून घनदाट जंगलातून गावाकडे जाण्यासाठी पायपीट करीत आहेत. प्रशासन व ग्रामस्थांकडून होत असलेल्या कारवाईच्या धास्तीने दिवसभर जंगलात विश्रांती घेतल्यानंतर रात्रभर ते हिंस्र प्राण्यांपासून जीव वाचवत कुटुंबाच्या भेटीच्या आस्थेने निघाले आहेत. तीनशे ते चारशे किलोमिटरच्या प्रवासात मजुरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने अनेकांचे आरोग्यही बिघडण्याची माहिती आहे. 

शेतीचा हंगाम आटोपल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसरे कुठलेही काम नसल्याने दरवर्षी हजारो नागरिक आपल्या कुटुंबासह तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याच्या कामासाठी जातात. यंदा जवळपास 20 ते 22 हजार मजूर तेलंगणा राज्यात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मजुरांना मिरचीच्या शेतावरच मुक्कामाने ठेवले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यामुळे मजुरांच्या झोपड्‌या कोसळल्याने मजुरांना निवाऱ्याची तसेच अन्नधान्याची चणचण जाणवू लागली. त्यामुळे हजारो मजुरांनी रात्रीच्या वेळी गोदावरी नदीचे पात्र पार करून आपापल्या गावाची वाट धरली आहे.

अवश्य वाचा- हाय रे दैवा! घरची चूल पेटविण्यासाठी `आमदारा`ला विकावी लागतेय मोळी

रात्रभर जंगलातून प्रवास केल्यानंतर ते दिवसा विश्रांती घेतात. ग्रामस्थ दिवसा अडथळा देत असल्यामुळे रात्री जेवढे जमेल तेवढे अंतर कापून मजूर आपल्या गावाकडे कूच करीत आहेत. दरम्यान, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मजूर ज्या भागातून पायपीट करीत आहेत, तो सर्व भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे जंगलातील हिंस्र प्राणी, विषारी किडे, साप, विंचू यांचाही सामना करावा लागत आहे. सततच्या प्रवासाने अनेकांचे आरोग्यही बिघडल्याची माहिती आहे. मजुरांसोबत 
त्यांचे दैनंदिन वापरायचे साहित्य आणि लहान मुलांचाही समावेश आहे. प्रशासनाने उपाययोजना करून तेलंगणातून येत असलेल्या जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. 

रात्रीच्या प्रवासात गेल्या युवकाचा जीव 

तेलंगणा येथून आपल्या गावाकडे निघालेल्या एका युवकाचा अंधारात वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जंगलातच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.29) उघडकीस आली. हा तरुण आपल्या नातेवाईकासोबत तेलंगणा राज्यात मिरची तोडाईच्या कामाला गेला होता. मात्र, परतीच्या प्रवासात काळाने त्याच्यावर झडप घातली. अक्षय बिच्चू कोडापे (वय 22) असे मृत युवकाचे नाव असून तो भंगारामपेठा येथील रहिवासी होता. सिरोंचा तालुक्‍यातील आरडा गावालगतच्या शेतशिवारातून जात असताना जमिनीवर पडलेल्या जिवंत वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.