esakal | साकोली तालुक्‍यात वन्यप्राण्यांच्या शिकारी वाढल्या...वनविभागाने करावी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

रात्रीच्या वेळी विरळ जंगलाचा फायदा घेऊन शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करीत आहेत. सध्या शेतातील पिकाकडे तृणभक्षक प्राणी येतात. अशावेळी वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे असल्यामुळे अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

साकोली तालुक्‍यात वन्यप्राण्यांच्या शिकारी वाढल्या...वनविभागाने करावी कारवाई

sakal_logo
By
मेदन लांडगे

कुंभली (जि. भंडारा) :  साकोली तालुक्‍यातील जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी शिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. परंतु, वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभाग यापासून अनभिज्ञ आहे. 

गेल्या मार्चपासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. ग्रामीण भागात लोकांना कामधंदे नाहीत. बेरोजगारामुळे युवक मंडळी दिवसभर पानटपऱ्यांवर बसून दिसतात. रात्रीच्या वेळी विरळ जंगलाचा फायदा घेऊन शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करीत आहेत. सध्या शेतातील पिकाकडे तृणभक्षक प्राणी येतात. अशावेळी वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे असल्यामुळे अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

वनविभाग अनभिज्ञ

रात्रीच्या वेळी हरिण, सांबर, घोरपड, ससा, लावे, रानडुक्कर यांची गावशिवारात शिकार केली जात आहे. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तींना मांसाची विक्री केली जाते. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे मांस खाणारे बऱ्याच प्रमाणात आहेत. गुप्तपणे होणारा हा बेकायदा प्रकारापासून वनविभाग अनभिज्ञ कसा, हा प्रश्‍न आहे.

असं घडलंच कसं  : नागपूरकर दोघांना आवरला नाही गावातील नदीत पोहण्याचा मोह, आणि घडली दुर्दैवी घटना

शिकारी टोळ्यांची शक्‍यता

ग्रामीण भागात सात ते आठ लोकांची टोळी सायंकाळनंतर शिकारीसाठी जाते. त्यांच्या सोबत जाळे, कुऱ्हाड, भाला आणि शिकारी कुत्रे असतात. हे लोक अनोळखी व्यक्तीसोबत सहसा व्यवहार करत नाही. त्यामुळे गावातील बऱ्याच लोकांना शिकार झाल्याची माहितीसुद्धा होत नाही. शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळे निसर्गचक्राचा समतोल बिघडत आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ होत असली तरी, त्याबाबत वनविभागाला काहीच माहिती नसल्याचे कर्मचारी सांगतात.

हेही वाचा - अरे व्वा... ताडोबा, पेंच प्रकल्पाबाबत पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

जनजागृती नावापुरतीच

वन्यप्राण्यांची शिकार व जंगलतोड टाळण्यासाठी वनविभागाकडून गावागावात जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत. शिकारीची माहिती दिली गेली तर, गुप्त माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणारे पोस्टरही लावले आहेत. तरीसुद्धा शिकारीच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे जनजागृतीबाबत वनविभागाने आपल्या धोरणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)