esakal | गडचिरोलीच्या मॉडेल कॉलेजला लागणार टाळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गडचिरोलीच्या मॉडेल कॉलेजला लागणार टाळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या समन्वयाअभावी गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला बंद करण्याची पाळी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्यात नागपूर विद्यापीठ कुचराई करीत असल्याने ही समस्या उद्‌भवल्याची ओरड केली जात आहे.
केंद्र सरकारने आदिवासीबहुल गडचिरोली, नंदुरबार, धुळे, वाशीम, तारकर्ली, मुंबई, जळगाव यासारख्या ठिकाणी मॉडेल कॉलेज सुरू केले होते. प्रत्येक कॉलेजला सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. परंतु, केंद्र सरकारच्या मदतीनंतरही मॉडेल कॉलेजने अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही.
चंद्रपूर व गडचिरोली ही दोन जिल्हे नागपूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असताना गडचिरोलीत मॉडेल कॉलेज देण्यात आले. त्यावेळी मॉडेल कॉलेज विद्यापीठाशी संलग्नित होते. परंतु, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ते हस्तांतरित करण्यात आले नाही. गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने 12-एफची मान्यता दिली नाही. त्यामुळे कॉलेज नागपूर विद्यापीठाकडेच राहिले. मात्र, नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनाने कॉलेजला सोयीसुविधा पुरविल्या नाहीत. याशिवाय या कॉलेजला नियमित प्राचार्यदेखील नाही.
नागपूर विद्यापीठाने मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शासनाकडे प्रस्तावसुद्धा पाठविण्यात आला. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगालाही विशेष बाब म्हणून मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्याची शिफारस केली आहे. नागपूर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. गोंडवाना विद्यापीठानेदेखील त्यांचे व्हिजन डॉक्‍युमेंट अमलात आणण्यासाठी समिती स्थापन केली. या दोन्ही समित्यांची गडचिरोलीत संयुक्त बैठक झाली. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळेपर्यंत राज्य सरकारचे अनुदान गोंडवानाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, डॉ. बारहाते समितीचा अहवाल अद्याप व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात आलेला नाही.
जागेचा तिढा कधी सुटणार
गोंडवाना विद्यापीठाला मॉडेल कॉलेजसाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या शेजारीच पाच एकर जागा गोंडवानाला देण्यात आलेली आहे. परंतु, नागपूर विद्यापीठाकडून मॉडेल कॉलेज हस्तांतरित होईस्तोवर गोंडवानाला तिथे इमारत बांधकामदेखील करता येणार नाही. मागील दोन वर्षापासून खुद्द गोंडवाना विद्यापीठ प्रशासन जागेसाठी अडचणीत सापडले आहे. नागपूर मार्गावर घेतलेली 60 एकर जागाही सध्या चौकशीच्या घेऱ्यात आहे.

loading image
go to top