गडचिरोली : प्रत्येक पूरग्रस्ताला वेळेत आणि आवश्यक मदत मिळणारच. तेव्हा पूरस्थितीनंतर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे, असे आश्वासन राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (ता. 3) पूरग्रस्तांशी बोलताना केले.
गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे 17033 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे पुरामुळे नुकसान झाले आहे. तसेच 4000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून वेळेत पंचनामे करून प्रत्येक पूरग्रस्ताला न्याय देण्यासाठी मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून जबाबदार आहे, असा दिलासा विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिला.
सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच आता पूरस्थिती ओसरल्यानंतर पुराच्या पाण्यामुळे तसेच दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. या दुहेरी संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे, असे ते म्हणाले. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरानंतरच्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पूरस्थितीबाबत माहिती दिली. पुरामुळे घरात पाणी शिरल्यामुळे 4174 लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
पुरामुळे 17033 हेक्टर आर शेती पाण्यात गेली असून शासन आवश्यक उपाययोजना करत असून लवकरच शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येणार असून 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे रुपये 5 हजार प्रमाणे तातडीची मदत देण्याची व्यवस्था करा, असे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले, साहित्याची, जनावरे यांची नासधूस झाली असेल त्याबाबत प्रशासनाने पंचनामे करून याबाबतचा अहवाल शासनास द्यावा. पुरामुळे घरांचे नुकसान झाल्यास तसेच पडझड झाल्यास पंचनाम्यानंतर शासनातर्फे 95 हजार रुपये देण्यात येतात. तसेच शेतीकरिता दर हेक्टरी रुपये 18 हजार प्रमाणे मदत करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्यक्ष शेतावर जाऊन बारकाईने पंचनामे करून कोणताही शेतकरी सुटणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले.
शेती, घरे, जनावरे याबाबतचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज शनिवारपर्यंत देण्यात यावा, असे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहे. पूरपरिस्थितीबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशीष येरेकर, सहायक पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ऍङ. राम मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-ठुबे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुराने नुकसान झालेल्या भागात दौरा केला. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा, आरमोरी तालुक्यातील चुरमुरा, डोंगरसावंगी, कोंढळा येथे भेट दिली. तसेच वडसा तालुक्यातील शहरातील हनुमाननगर तसेच आमगाव, सावंगी गावात भेट दिली. चुरमुरा या गावात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 4 जणांना निधीचे वाटप करण्यात आले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.