esakal | अबब किचनच्या बेसीनमध्ये दारूचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अबब किचनच्या बेसीनमध्ये दारूचा साठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : घरातील किचनमधील बेसिनचा वापर चक्क दारूची साठवणूक करण्यासाठी करण्यात आला. रविवारी पोलिसांनी बंगाली कॅम्प परिसरात केलेल्या कारवाईतून समोर आले. यावेळी तब्बल चार पेट्या दारू जप्त केल्या. तस्करी आणि साठवणुकीसाठी विक्रेते काय शक्कल लढवतील हे आता सांगणेच कठीण झाले आहे.
येथील बंगाली कॅम्प परिसरातील हरी बिस्वास नामक व्यक्ती दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिस्वास याचे घर गाठून घराची झडती घेतली. संपूर्ण घरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, पोलिसांना दारू सापडली नाही. पोलिसांनी मोर्चा स्वयंपाकगृहाकडे वळविला. येथेही झडती घेतली. परंतु, तेथेही पोलिसांना दारूसाठा आढळून आला नाही. अशातच एका कर्मचाऱ्याचे लक्ष स्वयंपाकखोलीतील बेसिनकडे गेले. स्वयंपाकखोलीत बेसिन तर होते. मात्र, पाणी जाण्याचा पाइप जोडलेला दिसत नव्हता. पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी बारकाईने बेसिनची झडती घेतली असता बेसिनच्या खाली एक कप्पा तयार करून त्यात दारूसाठा ठेवण्यात आला होता. या ठिकाणाहून तब्बल चार पेट्या दारू आढळून आली.
पोलिसांनी दारूसाठा जप्त केला असून, श्रुतिका हरी बिस्वास हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top