हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्याचे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्‍चित करण्यात आले आहे.

नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले.

सात अशासकीय विधेयकांवर चर्चा
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्‍चित करण्यात आले आहे. यात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा तसेच विधान परिषदेत 7 अशासकीय विधेयकांवर चर्चांचा समावेश आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवरसुद्धा चर्चा करण्यात आली. त्यामुळे अधिवेशन एकाच आठवड्याचे राहील अशी चर्चा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विरोधीपक्ष भाजपने दोन आठवडे अधिवेशन चालवावे अशी मागणी केली आहे.

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, अमिन पटेल, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय वड्डेटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

विधान परिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आमदार सर्वश्री विजय ऊर्फ भाई गिरकर, हेमंत टकले, डॉ. रणजित पाटील, शरद रणपिसे, सुरजितसिंह ठाकूर, भाई जगताप, अनिल परब, जयंत पाटील, रामहरी रूपनवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter session expected for a week