esakal | पैसे परत घेण्यास बोलावून महिलेस चौकात केली मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे परत घेण्यास बोलावून महिलेस चौकात केली मारहाण

पैसे परत घेण्यास बोलावून महिलेस चौकात केली मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्लॉटच्या इसाराची रक्कम घेऊन लुबाडल्यानंतर ते पैसे परत करण्याचे कारण सांगून महिलेला भेटीसाठी बोलविले. ऑटोत बसवून तिची छेडखानी केल्याचा आरोप असून महिलेने आरडाओरड केली असता एकाला परिसरातील लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत पंचवटी चौकात ही घटना घडली. (Calling-for-money-back-the-woman-was-beaten-in-the-chowk)

गोविंद भीमराव गतफणे (वय ४२, रा. महात्मा फुलेनगर), विलास विष्णुपंत जोशी (वय ५३, रा. राजापेठ) व प्रवीण अढाऊ (वय ४३) असे गुन्हा दाखल झालेल्या तीन संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेचा विलास जोशी यांच्यासोबत परिचय होता. जोशीने महिलेची ओळख गतफणेसोबत करून दिली.

प्लॉटच्या इसाराची रक्कम घेऊन आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने पैसे परत मागितले. मात्र, जोशी व गतफणे यांनी पैसे परत घेण्यासाठी तिला पंचवटी चौकात बोलावून ऑटोत बसविले. ऑटोत संशयित आरोपी गोविंद गतफणे यांनी बळजबरीचा प्रयत्न केला व तिला मारहाण केली. जोशीने बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महिलेने केला आहे.

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

महिलेने आरडाओरड केली असता ऑटोतील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही नागरिकांनी त्यापैकी एकाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यात तिन्ही संशयितांविरुद्ध विनयभंग, मारहाण, ठाक मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यात गोविंद गतफणे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

(Calling-for-money-back-the-woman-was-beaten-in-the-chowk)

loading image