
घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून महिलेचा मृत्यू
जारावंडी : जारावंडीपासून पाच किमी दूर असलेल्या दिंडवी येथे सोमवारी (ता. १६) रात्री एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरात असलेल्या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. हे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत जळालेल्या महिलेचे नाव पौर्णिमा उत्तम बल ( वय २९) असून तिला एक मुलगा आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे पडून वीज खंडित झाली होती. अशात मृतक पौर्णिमा सायंकाळी वीज नसल्याने इनव्हर्टर सुरू करून काम करीत होती.
दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने इनव्हर्टरला आग लागली. जवळपास साड्या आणि कपडे होते. विशेष म्हणजे हा परिवार किराणा दुकान चालवितो व सोबतच पेट्रोलची विक्रीसुद्धा करतो. आगीच्या दरम्यान पेट्रोल आणि खाद्य तेल जवळपास असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले व त्या आगीत पौर्णिमा बल हिचा जागीच मृत्यू झाला. आगीची माहिती समजताच गावातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले होते. या परिवाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
जवळचेच गेले मृत्यूच्या दारात....
मृत पौर्णिमाचे पती उत्तम बल यांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही. तीन वर्षांपूर्वी उत्तम बल यांचे भाऊ अपघातात मरण पावले. हे दुःख आवरत असताना त्यांचे वडील हृदयविकाराने मृत्यू पावले. हा शोक पचवीत असताना आता पत्नीचा जळून मृत्यू झाल्याने बल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Web Title: Woman Dies In House Fire Short Circuit Gadchiroli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..