esakal | प्रसुतीच्या कळा असह्य झाल्या पण कोणीही दाखवली नाही दया... मग

बोलून बातमी शोधा

गोंदिया : बाई गंगाबाई महिला रुग्णालय.

महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या... नातेवाइकांनी तिला येथील बाई गंगाबाई रुग्णालयात आणले... मात्र, प्रसूती वेदना सहन करणाऱ्या मातेकडे किंबहुना विनंती करणाऱ्या तिच्या नातेवाइकांकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष गेले नाही... शेवटी वेदनेने विव्हळत असलेल्या या मातेने रुग्णालयाच्या वऱ्हांड्यातच बाळाला जन्म दिला. रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार शनिवारी (ता. 21) पहाटेच्या सुमारास घडला.

प्रसुतीच्या कळा असह्य झाल्या पण कोणीही दाखवली नाही दया... मग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : डव्वा सटवा येथील निकिता कल्पेश पटले (वय 25) या मातेला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला शुक्रवारी (ता. 20) सकाळी 11 च्या सुमारास बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री तिला प्रसूतीच्या असह्य वेदना झाल्या. त्यामुळे नातेवाइकांनी डॉक्‍टरांकडे धावाधाव केली.

निकिता प्रसूतीवेदनेने विव्हळत आहे, आपण जरा लक्ष द्या, असे म्हणत विनवणी केली. परंतु, या विनवणीकडे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्षच केले. आपल्याच तोऱ्यात त्यांचा कारभार सुरू होता. शेवटी नाइलाजास्तव प्रसूतीवेदना असह्य झाल्याने या मातेने रुग्णालयाच्या वऱ्हांड्यातच बाळाला जन्म दिला.

त्यामुळे तिच्या नातेवाइकांसह रुग्णालयात उपस्थित अन्य नागरिकांनी रुग्णालयाच्या बेशिस्तीवर रोष व्यक्त केला. काहींनी तर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली.

वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

ही बातमी कानी येताच खळबळून जागे झालेल्या या निगरगट्ट कर्मचाऱ्यांनी त्या मातेकडे धाव घेतली. सोपस्कार पार पाडत तिला रुग्णालयाच्या खोलीत नेले. मात्र, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते; तर त्या मातेला वऱ्हाड्यांत प्रसूतीची वेळ आली नसती. उल्लेखनीय म्हणजे, या प्रकारानंतर संताप अनावर झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर एक नव्हे तर, अनेक खुलासे केले. आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. कोणी म्हणे चार दिवसांपासून भरती असूनही मातेची प्रसूती झाली नाही. आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे कठोर पाऊल उचलावे, अशी मागणीही होत आहे.

सिझरसाठी दीड हजार, नॉर्मलसाठी मोजा 500 रुपये

बाई गंगाबाई महिला रुग्णालय रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळण्यात आघाडीवर आहे. याचे ज्वलंत उदाहरण या घटनेनेही समोर आणले आहे. सिझरसाठी दीड हजार रुपये तर, नॉर्मलसाठी 500 रुपये घेतल्याशिवाय प्रसूतीकरिता कोणताही कर्मचारी हात लावत नसल्याचे तेथे उपस्थितांनी सांगितले.

हेही वाचा : दुधविक्री करून मुलाला बनविले पीएसआय, ही संघर्षगाथा वाचाच

या घटनेत काही तथ्य नाही
निकिता पटलेंच्याबाबत आपण म्हणत असलेल्या घटनेत काही तथ्य नाही. प्रसूती विभागात (कक्ष) डॉक्‍टरांच्या उपस्थितीतच तिची प्रसूती झाली.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई महिला रुग्णालय.