नातवाला वाचविण्यासाठी ६२ वर्षीय आजीची बिबट्याशी झुंज

चेतन देशमुख
Wednesday, 14 October 2020

धुरपताबाई नातू रितेशसोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात असताना हिवारा मारुती पांदण रस्त्यावरील बाजूच्या शेतात उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रितेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

उमरखेड (जि. यवतमाळ): शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चालगणी शिवारात घडली. बिबट्याने नातवावर केलेला हल्ला परतून लावण्यासाठी आजीने झुंज दिली. 

हेही वाचा - बिअरच्या बाटलीवरील 'क्राऊन कॉर्क' अन् 'ओपनर'चा शोध लावणारी...

धुरपताबाई तुकाराम सातलवाड (वय ६२, रा. चालगणी), असे जखमी महिलेचे नाव आहे. धुरपताबाई नातू रितेशसोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात असताना हिवारा मारुती पांदण रस्त्यावरील बाजूच्या शेतात उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रितेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच महिलेने हातातील टोपले बिबट्यावर मारले. त्यामुळे बिबट्याने नातवाला सोडून आजीवर हल्ला केला. यात महिला जखमी झाली. आरडाओरड केल्याने शिवारातील शेतकरी, मजुरांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याने जंगलात पळ काढला. या घटनेत धुरपताबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. मात्र, तेथे दाखल करून घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. अखेर सामाजिक कार्यकर्ते जाकीर राज यांच्या सहकार्याने महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman injured in leopard attack in umarkhed of yavatmal