esakal | घरी मोठ्या प्रमाणावर जमलेले शेणखत फेकण्यासाठी गेली महिला; मात्र, वाघाने घेतला नरडीचा घोट
sakal

बोलून बातमी शोधा

Woman killed in tiger attack in Chandrapur district

बराचवेळ लोटून त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा गावाबाहेर त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस, वनविभागाला देण्यात आली.

घरी मोठ्या प्रमाणावर जमलेले शेणखत फेकण्यासाठी गेली महिला; मात्र, वाघाने घेतला नरडीचा घोट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : शेणखत फेकण्यासाठी गावाबाहेर गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी सात वाजताच्या सुमारास डोर्ली (चिचगाव) येथे घडली. मृत महिलेचे नाव ताराबाई विश्‍वनाथ खरकाटे (वय ६०) असे आहे. काही दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन नागरिकांना होत आहे. वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, डोर्ली गावात ताराबाई खरकाटे राहतात. घरी मोठ्या प्रमाणावर शेणखत जमले होते. ते फेकण्यासाठी गुरुवारी (ता. ३) सकाळी गावाबाहेर गेल्या होत्या. तेव्हाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या नरडीचा घोट घेत ठार केले. घटनास्थळापासून काही अंतरावर त्यांना फरकटत नेले.

अधिक वाचा - ताडोबाला पर्यटनासाठी जाताना सुटले गाडीवरील नियंत्रण अन् घडला मृत्यूचा थरार

बराचवेळ लोटून त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा गावाबाहेर त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस, वनविभागाला देण्यात आली.

दोन्ही विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात चार-पाच मोठे वाघ असल्याची चर्चा नागरिकांत आहे. गावालगत व रस्त्यालगत असलेल्या झुडपांची साफसफाई करावी. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

धानोऱ्यात बिबट जेरबंद

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र धानोराअंतर्गत येत असलेल्या जांभळी येथील सुरेश सोमा धुर्वे यांच्या घरी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेळीची शिकार करण्यासाठी घरात बिबट्या घुसला. मात्र, तो रात्रभर तिथेच दबा धरून बसल्याने गावकऱ्यांची तहानभूक विसरले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला तिथेच बंद करून ठेवले याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत दहाच्या सुमारास बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

संपादन - नीलेश डाखोरे